
प्रोमेनेड कामातून मडगावातील झिग-झॅग भ्रष्टाचार उघड : प्रभव नायक
मडगाव: आकें येथील रिंग रोडवरील तथाकथित प्रोमेनेड प्रकल्पासाठी अस्तित्वातील फुटपाथ तोडून पायवाटेवरील पॅव्हर्स उखडण्याचे काम हे मडगावचे पक्षबदलू आमदार तथा सार्वजनीक बांधकाम मंत्री झालेल्या दिगंबर कामत यांच्या कार्यकाळातील झिग-झॅग भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे. आज दिसणारे विचित्र, रोलर-कोस्टरसारखे वळणावळणाचे गटार हे विकासाचे नव्हे, तर भ्रष्टाचाराचे स्मारक आहेत. हा विकास नसून करदात्यांच्या कष्टाच्या पैशांची उढळपट्टी आहे, असा आरोप मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे.
यात भर म्हणून, मडगावचे डिफेक्टर आमदार तथा पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत यांनी आता २७ गाडे “इतर ठिकाणांहून” हटवून या प्रोमेनेडवर पुनर्वसन करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. हे अतिशय अस्पष्ट आणि दिशाभूल करणारे विधान आहे. सदर २७ गाडे नेमक्या कोणत्या ठिकाणांहून हटवण्यात येणार आहेत, तसेच कोणत्या धोरणाअंतर्गत व कायदेशीर चौकटीत हे पुनर्वसन केले जात आहे, हे त्यांनी तात्काळ स्पष्ट करावे, अशी मागणी नायक यांनी केली.
अधिक गंभीर बाब म्हणजे, या प्रस्तावित स्थलांतरामुळे या परिसराच्या पवित्रतेला थेट धोका निर्माण होतो, कारण याच ठिकाणी श्री गणेश मंदिर उभारण्यात येत आहे. मग हे गाडे नेमके काय विकणार आहेत? मंदिर परिसराचे चिकन, मटण आणि दारूच्या साम्राज्यात किंवा समाजविघातक घटकांच्या अड्ड्यात रूपांतर केले जाणार आहे का? यामुळे मंदिर परिसराची आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पवित्रता धोक्यात येणार नाही का, असा थेट सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला.
प्रभव नायक यांनी मडगावातील वकील, अभियंते, वास्तुविशारद, शिक्षक, डॉक्टर आणि नगररचनाकार अशा सर्व व्यावसायिकांना आवाहन केले की, भ्रष्टाचाराचा राक्षस संपूर्ण शहर गिळण्यापूर्वी त्यांनी आवाज उठवावा. पारदर्शकता, जबाबदारी आणि सार्वजनिक श्रद्धेचा सन्मान यासाठी एकत्रितपणे मागणी केली पाहिजे. सामान्य बुद्धी, संस्कृती आणि सार्वजनिक पैसा यांचा बळी देऊन विकास लादता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेचे पदसिद्ध सदस्य असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो, यांना तात्काळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याचे, हस्तक्षेप करण्याचे आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेली बेकायदेशीर व मनमानी कामे त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.

