अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘bob e Pay’वर आता फिंगरप्रिंटद्वारे UPI व्यवहार

मुंबई : बँक ऑफ बडोदाने आपल्या ‘bob e Pay’ या सार्वत्रिक यूपीआय अ‍ॅपमध्ये तीन नवीन डिजिटल सुविधा सुरू केल्या आहेत. मोबाईलवरील बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे पेमेंट, UIDAI आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे यूपीआय पिन सेट किंवा रीसेट करण्याची सुविधा आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) आधारित यूपीआय पेमेंट्स यांचा त्यात समावेश आहे. हे अ‍ॅप कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना वापरता येते.

बँकेचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार यांनी सांगितले की, ग्राहकांना अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंटचा अनुभव देण्याच्या उद्देशाने या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

नवीन सुविधेनुसार ग्राहकांना मोबाईलमध्ये नोंदणीकृत फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीच्या मदतीने ५ हजार रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार मंजूर करता येणार आहेत. यासाठी प्रत्येक वेळी यूपीआय पिन टाकण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा व्यक्ती ते व्यक्ती (P2P) तसेच व्यक्ती ते व्यापारी (P2M) व्यवहारांसाठी उपलब्ध असेल.

याशिवाय, यूपीआय पिन सेट किंवा रीसेट करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न फेस ऑथेंटिकेशनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे डेबिट कार्ड किंवा पारंपरिक आधार पडताळणी प्रक्रियेवरील अवलंबित्व कमी होणार आहे. ग्राहक चेहरा ओळख तंत्रज्ञान आणि बँकेकडून प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या यूपीआय पिन तयार किंवा बदलू शकतील.

बँकेने IoT आधारित यूपीआय पेमेंटची सुविधाही सुरू केली असून ग्राहकांना समर्थित स्मार्ट उपकरणे किंवा कनेक्टेड वाहनांद्वारे थेट यूपीआय व्यवहार करता येणार आहेत. या व्यवस्थेत प्राथमिक वापरकर्ता ठरावीक मर्यादेत इतर वापरकर्ता किंवा उपकरणाला व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकतो. प्रत्येक IoT उपकरण एका वेळी केवळ एका वापरकर्त्याशी जोडले जाईल, अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

या सुविधांमुळे डिजिटल पेमेंट अधिक सहज, वेगवान आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकल्याचा दावा बँकेने केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!