पणजी : जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाने तसेच आरोग्य संचालनालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या सहकार्याने शनिवारी आठव्या गोवा अँटी टोबॅको फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले. माकिनेज पॅलेस येथील ईएसजीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
यंदाच्या महोत्सवाची संकल्पना ‘अनमास्किंग द अपील : काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको अॅडिक्शन’ अशी होती. तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती करणाऱ्या जाहिरातपटांची स्पर्धा राष्ट्रीय आणि गोवा अशा दोन विभागांत आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय विभागात सहा, तर गोवा विभागात नऊ अशा एकूण १५ चित्रफिती स्पर्धेत सहभागी झाल्या.
राष्ट्रीय विभागात गोपाल भिंबर दिग्दर्शित ‘द पॅरासाईट’ या चित्रफितीने प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिक कारेकर यांच्या ‘अनमास्क द अपील’ या चित्रफितीला द्वितीय, तर रिशभ अबीझीर ब्रिटो यांच्या ‘फनी क्रिचर्स’ या चित्रफितीला तृतीय क्रमांक मिळाला.
गोवा विभागात संगम गवडे यांच्या ‘स्लो लाइफ प्रा. लि.’ या चित्रफितीला प्रथम क्रमांक मिळाला. ‘मूळ (रूट्स)’ या आशिर्वाद मूव्हिंग इमेजेसच्या चित्रफितीला द्वितीय, तर योगेश शिरोडकर यांच्या ‘माजो पापा’ या चित्रफितीला तृतीय क्रमांक मिळाला.
स्पर्धेचे परीक्षण आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक (दंत) डॉ. हर्षा राजाध्यक्ष, नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर टोबॅको इरेडिकेशन (NOTE) इंडियाचे सचिव डॉ. देवदत्त साळ आणि अभिनेते व उद्योजक ध्रुव सिंक्रो यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आरोग्य विभागाचे सचिव यतींद्र एम. मराळकर यांनी २०१७ पासून हा महोत्सव सातत्याने आयोजित केला जात असून तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी तो प्रभावी व्यासपीठ ठरल्याचे सांगितले. जीवन हा अनमोल ठेवा असून धूम्रपानासारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य संचालनालयाच्या असंसर्गजन्य रोग विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांनी धूम्रपान हे अनेक गंभीर आजारांचे कारण असल्याचे सांगत तंबाखूविरोधी लढ्यात जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
गोवा डेंटल कॉलेजच्या सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. अमिता केंकरे कामत यांनी स्वागतपर भाषणात तंबाखूजन्य पदार्थ आकर्षक पद्धतीने सादर करून तरुणांना लक्ष्य केले जात असल्याची चिंता व्यक्त केली. अशा पार्श्वभूमीवर सिनेमाच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विजेत्यांना यतींद्र मराळकर आणि डॉ. संदेश मडकईकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेतील चित्रफितींचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले.


