गोवा

गोवा काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप; संघटन बळकटीकरणावर भर

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या (जीपीसीसी) संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी आणि पक्षाच्या विविध घटकांमधील समन्वय वाढविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे.

११ जून रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, जीपीसीसीचे कार्याध्यक्ष एम. के. शेख यांच्याकडे प्रशासन आणि संघटनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्याध्यक्ष अॅड. कार्लोस फरेरा यांच्याकडे उत्तर गोवा तसेच म्हादई जिल्हा काँग्रेस समितीच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली असून, माजी जिल्हाध्यक्ष विरेंद्र सिरोडकर त्यांना सहकार्य करणार आहेत.

कार्याध्यक्ष आल्टोन डिसोझा यांच्याकडे दक्षिण गोवा आणि खुशावती जिल्हा काँग्रेस समितीच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना मदत करण्यासाठी जीपीसीसीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेसचे खजिनदार दत्ता नाईक यांच्याकडे आर्थिक व्यवहारांची जबाबदारी देण्यात आली असून, माजी खजिनदार जेम्स अँड्रेड यांना त्यासाठी सहकार्याची भूमिका देण्यात आली आहे.

जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा अनुभव आणि कार्यक्षमता पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यास हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!