
‘गोंय राखण यात्रा’ सप्टेंबरपासून; सत्तेत आल्यास कलम 39-अ रद्द करण्याचे काँग्रेसचे आश्वासन
म्हापसा : काँग्रेसच्या वतीने म्हापसा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जनक्रांती’ कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी कलम 39-अ रद्द करण्याचे आश्वासन दिले. तसेच रोजगारनिर्मिती, आरोग्य क्षेत्रासाठी अधिक अर्थसंकल्पीय तरतूद आणि गोव्याशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲल्टन डिकास्ता, कार्लोस अल्वारीस फेरेरा, एम. के. शेख, माजी खासदार फ्रान्सिस्को सार्दिन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत, धार्मिक ध्रुवीकरणाद्वारे समाजात फूट पाडली जात असल्याची टीका केली. गोव्याचा विनाश रोखण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.
गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकार गोव्याची ओळख पुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. गोव्यातील जमीन व्यवहार, विविध प्रकल्प आणि पर्यावरणीय प्रश्नांवरून राज्यभर आंदोलने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. गोव्याची वहनक्षमता किती असावी, याचा निर्णय गोवेकरांनीच घ्यावा, असेही ते म्हणाले.

सत्तेत आल्यानंतर गोव्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप असलेले कायदे आणि तरतुदी रद्द करण्यात येतील, असे आश्वासन चोडणकर यांनी दिले. पारंपरिक व्यवसायांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजपवर सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. तसेच २२ सप्टेंबरपासून ‘गोयं राखों यात्रा’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या यात्रेद्वारे बेरोजगारी, जमीन व्यवहार, नोकरी भरती आणि लोकशाही संस्थांबाबतचे प्रश्न जनतेसमोर मांडले जातील, असे त्यांनी सांगितले.
खासगी क्षेत्रात भूमिपुत्रांसाठी ८० टक्के आरक्षण लागू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
डॉ. अंजली निंबाळकर यांनी महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडल्याचे सांगत, योग्य आर्थिक धोरणांद्वारे परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले. शशांक नार्वेकर यांनी स्वागत केले, तर आसीझ नोरोन्हा यांनी आभार मानले.







