
स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर मडगाव घडविण्यासाठी कटिबद्ध : प्रभव नायक
मडगाव: मडगांवचो आवाजच्या ‘चकचकीत मडगाव मिशन’ अंतर्गत आज कोलमोरोड, मडगाव येथे वाढलेली झुडपे व गवत काढून परिसर स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमामुळे परिसराची स्वच्छता, दृश्यमानता आणि एकूणच सौंदर्य वाढण्यास मदत झाली. मडगाव अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी अनुकूल बनविण्याच्या उद्देशाने ही मोहीम सातत्याने राबविली जात आहे.
युवा नेते प्रभव नाईक यांनी सांगितले की, ही मोहीम केवळ मडगावच्या जनतेची सेवा करण्याच्या भावनेतून राबविली जात आहे. “एक-एक पाऊल टाकत आम्ही स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर मडगाव घडविण्यासाठी काम करत आहोत. आजचे छोटे प्रयत्न उद्याच्या चांगल्या शहराचा पाया ठरू शकतात. मात्र, अशा लोकहिताच्या कामांवर राजकीय दबावाखाली त्रास दिला जाऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
प्रभव नाईक यांनी आठवण करून दिली की, यापूर्वी मालभाट येथे अशाच प्रकारची स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर गोळा केलेला कचरा वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. सार्वजनिक स्वच्छतेसाठी आणि प्रलंबित नागरी समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असतानाही अशी कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

या कारवाईला त्यांनी छळवणुकीचे स्वरूप असल्याचे म्हटले आणि मडगांवचो आवाजवरच निवडक कारवाई का केली जाते, असा सवाल उपस्थित केला. मडगांवचो आवाजने अशा स्वच्छता मोहिमा सुरू केल्यानंतर इतरांनीही तत्सम उपक्रम हाती घेतले. मात्र, अनेक उपक्रम अर्धवट सोडण्यात आले किंवा त्यांना अपेक्षित परिणामापर्यंत नेण्यात अपयश आले, असे त्यांनी सांगितले.
“मडगावची जनता केवळ प्रसिद्धीसाठी केलेले उपक्रम आणि खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या भावनेतून केलेले काम यातील फरक ओळखते. मडगांवचो आवाजने सातत्याने नागरी प्रश्न, स्वच्छता, लोकांच्या तक्रारी, वारसा, संस्कृती आणि विकासाच्या मुद्द्यांवर प्रामाणिकपणे काम केले आहे,” असे नाईक म्हणाले.
“मडगांवचो आवाज हे केवळ एकदिवसीय कार्यक्रम किंवा प्रसिद्धीसाठीचे व्यासपीठ नाही. मडगावच्या जनहितासाठी आम्ही प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक मोहिमेला तिच्या अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यास कटिबद्ध आहोत. निवडक कारवाई किंवा कोणत्याही प्रकारच्या छळवणुकीमुळे आम्ही जनसेवेपासून परावृत्त होणार नाही,” असे प्रभव नाईक यांनी ठामपणे सांगितले.







