देश/जगमहाराष्ट्र

अयोध्या राम मंदिरातील देणग्यांच्या गैरव्यवहारावरून राज ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्या, दागदागिने आणि निधीच्या व्यवस्थापनाबाबत कथित अनियमिततेच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सोशल मीडियावरील सविस्तर पोस्टमध्ये ठाकरे यांनी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचा उल्लेख करत, या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी मौन बाळगल्याचा आरोप केला. प्रभू श्रीराम यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी मंदिरातील कथित आर्थिक अनियमिततेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, असे त्यांनी म्हटले.

राम मंदिर हे देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असून, भाविकांनी अर्पण केलेली देणगी ही त्यांच्या श्रद्धेची आणि कष्टाच्या कमाईची असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. त्यामुळे मंदिरातील निधीचा प्रत्येक पैशाचा पारदर्शक हिशोब ठेवणे आणि लोकांसमोर मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे यांनी मंदिरांच्या व्यवस्थापनातील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत, देशातील विविध मंदिरांमधील आर्थिक व्यवहार अधिक उत्तरदायी पद्धतीने व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रद्धेच्या नावावर कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले.

या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी आणि भाविकांच्या श्रद्धेचा भंग होणार नाही, याची सरकारने खात्री द्यावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!