गोवादेश/जग

विद्यार्थ्यांवरील कारवाईचा आप युवा आघाडीचा निषेध

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पणजी : जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा आम आदमी पार्टी (आप) गोवा युवा आघाडीने तीव्र निषेध केला आहे. वारंवार होणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा मारा आणि बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

आप गोवा युवा आघाडीचे अध्यक्ष पुजन मालवणकर, उपाध्यक्ष न्येश कुतीन्हो, उत्तर गोवा युवा आघाडीच्या अध्यक्षा दुर्वा पेडणेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.

यावेळी बोलताना पुजन मालवणकर यांनी भाजप नेते नरेंद्र सावईकर यांनी विद्यार्थ्यांचा उल्लेख “वाळवी” असा केल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. हे वक्तव्य विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा अपमान करणारे असल्याचा आरोप करत, सावईकर यांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असताना सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप करत मालवणकर यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना भाजप का पाठीशी घालत आहे, असा सवाल उपस्थित केला. विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई ही युवकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी असल्याची टीकाही त्यांनी केली.

आपचे उपाध्यक्ष न्येश कुतीन्हो म्हणाले की, युवक हे देशाचे भविष्य असून जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांवर झालेली कारवाई लोकशाहीला धरून नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रश्नपत्रिका फुटीबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

उत्तर गोवा युवा आघाडीच्या अध्यक्षा दुर्वा पेडणेकर यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला विद्यार्थिनींशी झालेल्या कथित गैरवर्तनाबाबतही चिंता व्यक्त केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या महिला विद्यार्थिनींना मारहाण करणे आणि त्यांच्याशी अयोग्य वर्तन करणे निषेधार्ह असल्याचे त्या म्हणाल्या.

आपच्या नेत्या वेदिका यांनी प्रश्नपत्रिका फुटीमुळे मेहनती विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे सांगितले. पालक आणि विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षांच्या परिश्रमांवर अशा घटनांमुळे पाणी फिरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

देशभरातील विद्यार्थ्यांना न्याय्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह शिक्षण व्यवस्था मिळावी, यासाठी आम आदमी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा पुनरुच्चार पक्षाने केला. तसेच प्रश्नपत्रिका फुटी आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित हिंसाचारासाठी जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!