
रघुवीर व प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘बॅगलेस डे’ उत्साहात
पणजी : विद्यार्थ्यांना नेहमीच्या वर्गखोल्यांतील शैक्षणिक वातावरणापासून काही काळ दूर नेत त्यांच्यातील सर्जनशीलता, संघभावना, समन्वय आणि कौशल्यांना वाव देण्यासाठी चोडणा येथील रघुवीर व प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघटनेच्या (PTA) वतीने १४ ऑगस्ट रोजी ‘बॅगलेस डे’चे आयोजन करण्यात आले. विविध पारंपरिक खेळ, स्पर्धा आणि कौशल्याधारित उपक्रमांमुळे या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमांतर्गत नारळाच्या करवंटीवरील चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विविध चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. या स्पर्धेत अकरावी वाणिज्य शाखेतील इस्माईल कुकनूर याने प्रथम क्रमांक पटकावला. याच वर्गातील सेजल इन्सुलकर हिने द्वितीय, तर बारावी कला शाखेतील वेदिका कंडोलकर हिने तृतीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमातील पारंपरिक खेळांनी विशेष रंगत आणली. दोरीखेच आणि लगोरी या खेळांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक व उपस्थित पाहुण्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. त्यामुळे कार्यक्रमाला स्पर्धात्मकतेसोबतच आनंदी आणि खेळकर वातावरण लाभले. फुट क्रिकेट, बाटलीत पाणी भरणे तसेच चेंडू बादलीत टाकणे या उपक्रमांचाही विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. या खेळांमधून विद्यार्थ्यांची एकाग्रता, चपळता, समन्वय, संघभावना आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या नीना वेर्णेकर यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या प्रायोजकत्वातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी प्रशिल साळकर, नीता लोटलीकर, प्रेमानंद महांबरे, दिलीप फोंडेकर आणि विद्यालयाचे प्राचार्य संदीप सावळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना नीना वेर्णेकर यांनी ‘बॅगलेस डे’च्या उपक्रमाचे कौतुक केले. पारंपरिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, एकोपा आणि परस्परांतील मैत्रीची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी सांगितले. प्रशिल साळकर यांनी लगोरी खेळताना बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्रेमानंद महांबरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०च्या संदर्भात अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधताना केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता अनुभवाधारित आणि शैक्षणिकेतर उपक्रमांनाही महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य संदीप सावळ यांनी मान्यवर व सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. पालक-शिक्षक संघटनेने ‘बॅगलेस डे’चे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लुईझा परेरा यांनी केले.







