
पणजी : आम आदमी पार्टीचे (आप) गोवा राज्याचे माजी संयोजक राहुल म्हांबरे यांनी मंगळवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. पणजी येथील काँग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे उपाध्यक्ष तुलिओ डिसोझा, डॉ. प्रमोद साळगावकर, कार्याध्यक्ष अॅड. कार्लोस आल्वारीस फेरेरा, सरचिटणीस प्रदीप नाईक, मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, युवक काँग्रेसचे प्रभारी जनार्दन भंडारी, गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अर्चित नाईक, प्रवक्ते महेश म्हांबरे, समील व्होल्वोईकर, जिल्हाध्यक्ष अॅड. शशांक नार्वेकर, मंगलदास नाईक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
राहुल म्हांबरे यांचे स्वागत करताना गिरीश चोडणकर म्हणाले की, लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि जनहिताच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी काँग्रेस हा नैसर्गिक पर्याय ठरत आहे. म्हांबरे यांचा राजकीय अनुभव आणि जनसंपर्काचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्याध्यक्ष अॅड. कार्लोस आल्वारीस फेरेरा यांनी संविधानिक मूल्ये, धर्मनिरपेक्षता आणि जनसेवेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे काँग्रेसमध्ये स्वागत असल्याचे सांगितले. राहुल म्हांबरे यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि जनहिताच्या मुद्द्यांवर पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असे ते म्हणाले.
काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर राहुल म्हांबरे म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा देशाच्या जडणघडणीत ऐतिहासिक वाटा असून, सखोल विचारांती आपण हा निर्णय घेतला आहे. लोकशाहीचे संरक्षण, गोव्याची ओळख आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले. तळागाळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि गोमंतकीयांच्या हक्कांसाठी काम करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष अॅड. शशांक नार्वेकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर तुलिओ डिसोझा, डॉ. प्रमोद साळगावकर आणि अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेस संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाईक यांनी केले, तर महेश म्हांबरे यांनी आभार मानले.
राहुल म्हांबरे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे गोव्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल आणि जनाधार विस्तारण्यास मदत होईल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.







