‘गोव्यात प्लास्टिक, कचरा मुक्त गावाला मिळणार पुरस्कार’
पणजी: सरकारतर्फे गोव्यातील (Goa) सर्व महसूली गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. प्लास्टिक, कचरा मुक्त तसेच स्वच्छतेचे अन्य निकष पूर्ण करणाऱ्या गावाला मोठ्या रकमेचा पुरस्कार देण्यात येईल. १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केली.
शनिवारी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने राज्यातील पंच, सरपंचासह स्वयंपूर्ण मित्रांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘हरित गोवा स्वच्छ गोवा‘ उपक्रमाची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोव्यामध्ये रस्त्याच्या बाजूला हरित कॉरिडॉर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी पत्रादेवी ते पोळे पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला झाडे लावण्यात येणार आहेत.
पुढील तीन महिन्यात १० लाख झाडे लावण्यात येतील. रस्त्याच्या बाजूला शेती करणाऱ्यांनी आपल्या शेतात झाडे लावावीत. या झाडांची मालकी पूर्णपणे शेतकऱ्याची असेल. पंचायत, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांनी आपल्या आवारात वृक्षारोपण मोहिमा राबवाव्यात. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, कृषी, वन खात्यातील अधिकारी मदत करतील.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, झाडे लावल्यानंतर त्याची देखभाल व पाणी घालण्याचे काम सरकारतर्फे केले जाईल. महिला बचत गटांनी हे काम हाती घेतल्यास त्यांना वेतन दिले जाईल. तीन महिन्यानंतर या उपक्रमात चांगले काम केलेल्या पंचायत तसेच अन्य संस्थांना पारितोषिक दिले जाईल.
लोकांनी वड, पिंपळ, अर्जुन अशी कमी होत चाललेली झाडे लावावीत. गोव्याला हरित करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या समारोपाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सर्व पंचायतींनी माझे घर योजनेअंतर्गत विविध अर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले. अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मदत करावी असेही ते म्हणाले. योजनेचा सुमारे १ लाख गोमंतकीयांना फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



