
गोवा काँग्रेस सेवा दलाकडून राष्ट्रीय मुख्य संघटक बी. व्ही. श्रीनिवास यांचा सत्कार
नवी दिल्ली : गोवा प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या शिष्टमंडळाने शनिवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) नवी दिल्लीतील २४ अकबर रोड येथील मुख्यालयात काँग्रेस सेवा दलाचे नवनियुक्त राष्ट्रीय मुख्य संघटक बी. व्ही. श्रीनिवास यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
गोवा प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे राज्य मुख्य संघटक राजन घाटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने श्रीनिवास यांना गोव्यातील सेवा दलाच्या संघटनात्मक कामकाजाची तसेच आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. तळागाळात संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारांनुसार जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस सेवा दल कटिबद्ध असल्याचे घाटे यांनी यावेळी सांगितले.
बी. व्ही. श्रीनिवास यांनी गोवा काँग्रेस सेवा दलाच्या कार्याचे कौतुक करत संघटनेचा विस्तार करण्याबरोबरच सेवा उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी सातत्याने संवाद ठेवण्याचे आवाहन केले.
या शिष्टमंडळात गोवा काँग्रेस सेवा दलाच्या निरीक्षक कल्पना जोशी, उपमुख्य संघटक खुशाली नामशीकर, अँथोनेट रोझ डायस, मारिया सिमोएस, सुनीता गोलटेकर, दामोदर शिरोडकर, रामा पळयेकर, दिना मौलिंगकर, उदय चारी, अमित कोरगावकर आणि अमोल धारवाडकर यांचा समावेश होता.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या प्रतिनिधींनी बी. व्ही. श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाची संघटना देशभरात अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.







