गोवा

वाढीव वीजबिलावरून ‘आप’चा भाजप सरकारवर हल्लाबोल

पणजी : राज्यातील वाढीव वीजबिलांची संपूर्ण माफी आणि आधीच बिले भरलेल्या ग्राहकांना परतावा देण्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाने (आप) पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे शिष्टमंडळासह भेटीसाठी वेळ मागितला असून, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर १२ दिवस उलटूनही एकाही ग्राहकाला प्रत्यक्ष दिलासा मिळालेला नसल्याचा आरोप केला आहे.


सरफराज अन्कलगी, अस्लम पंजाबी आणि हर्टन फर्नांडिस यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले की, राज्यातील हजारो कुटुंबांना वाढीव वीजबिलांचा आर्थिक फटका बसला आहे. सरकारने केवळ आश्वासने न देता सर्व वाढीव वीजबिलांच्या संपूर्ण माफीचा अधिकृत आदेश काढावा, तसेच पर्याय नसल्याने बिले भरलेल्या ग्राहकांना परतावा द्यावा.


नाईक यांनी सरकारकडे तीन प्रमुख मागण्या मांडल्या. सर्व वाढीव वीजबिले माफ करणे, भरलेल्या बिलांचा परतावा देणे आणि प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिट मोफत वीज उपलब्ध करून देणे. याशिवाय राज्यभर अखंड २४x७ वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचीही त्यांनी मागणी केली.


“दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारांनी अशा योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. मग गोव्यात त्या का शक्य नाहीत?” असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. भाजप सरकारकडे जनकल्याणासाठी आवश्यक इच्छाशक्ती नसल्याचा आरोपही त्यांनी केला.



मुख्यमंत्री आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेली विधाने केवळ पोकळ आश्वासने असल्याचा आरोप करत नाईक म्हणाले की, “१२ दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यावरून सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट होते.”


यावेळी ‘आप’चे अल्पसंख्याक विभागाचे नेते सरफराज अन्कलगी यांनीही सरकारवर टीका केली. निवडणुका जवळ आल्यामुळेच सरकारकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात असून, प्रत्यक्षात वीजबिल माफीची कोणतीही इच्छा नसल्याचा आरोप त्यांनी केला. “जनतेला घोषणांची नव्हे, तर कृतीची गरज आहे. प्रत्येक प्रभावित ग्राहकाला दिलासा मिळेपर्यंत ‘आप’ हा मुद्दा लावून धरणार,” असे अन्कलगी म्हणाले.


दरम्यान, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास नागरिकांवर पुन्हा वाढीव शुल्क आणि जादा वीजबिलांचा बोजा पडेल, असा इशाराही नाईक यांनी दिला. राज्यातील प्रत्येक ग्राहकाला न्याय मिळेपर्यंत पक्षाचा संघर्ष सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!