गोवा

मडगावच्या जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी

मडगाव: मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी सोमवारी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत दोन स्वतंत्र निवेदने सादर करुन शहरातील विकासकामांबद्दल मडगांवकरांना विश्वासात घेण्याची मागणी केली. त्यांच्या सोबत समाजसेवक दत्तराज पै फोंडेकर, वेंसी सिरीलो आंजेलो गोंसाल्विस व सुधर्मा कळंगुटकर हजर होते.


पहिल्या निवेदनात प्रभव नायक यांनी जुन्या मडगाव बसस्थानकाच्या जागेच्या पुनर्विकासासंदर्भात कोणताही घाईघाईने निर्णय घेऊ नये, तसेच जनतेशी सल्लामसलत आणि पूर्ण पारदर्शकता राखावी, अशी मागणी केली. अलीकडेच झालेल्या जुन्या बसस्थानक परिसराच्या पाहणीबाबत स्पष्टीकरण मागताना, नगरपालिका सध्या प्रशासकांच्या अखत्यारीत असताना अशा महत्त्वाच्या निर्णयांची घाई का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावचा विकास केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत करण्याची घोषणा केली असली, तरी शहरासमोरील ढासळती पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या, वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता आणि नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न याकडे प्रथम लक्ष देणे आवश्यक आहे. स्वतंत्र आणि तुकड्या-तुकड्यांत प्रकल्प राबविण्याऐवजी शहरासाठी सर्वंकष विकास व बचाव आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे प्रभव नायक यांनी  म्हटले आहे.


जून २०२५ मध्ये झालेल्या ड्राफ्ट मास्टर प्लॅन २०४१ च्या सादरीकरणावेळी नागरिकांनी व्यापक लोकसहभाग आणि भागधारकांशी सल्लामसलत करण्याची मागणी केली होती, याचीही नायक यांनी आठवण करून दिली. तसेच मडगाव नगरपालिका इमारतीच्या मागे प्रस्तावित हायड्रॉलिक पार्किंग प्रकल्पालाही मडगांवचो आवाजने विरोध दर्शविला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या दमट, अतिवृष्टी आणि क्षारयुक्त वातावरणात अशा यंत्रणेची उपयुक्तता, देखभाल आणि दीर्घकालीन शाश्वतता याबाबत गंभीर शंका असल्याचे प्रभव नायक यांनी नमूद केले.


दुसऱ्या निवेदनात प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिका उद्यान आणि आगाखान पार्कच्या प्रस्तावित विकासासंदर्भातील कोणत्याही सादरीकरणाची माहिती नागरिकांना आणि भागधारकांना आगाऊ देण्याची मागणी केली. या विषयावर यापूर्वी अनेक निवेदने तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज सादर करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.


मडगांवचो आवाजचे मत आहे की, मडगावच्या विकासाशी संबंधित प्रत्येक निर्णयात पारदर्शकता, लोकसहभाग आणि उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. शहराच्या भवितव्याशी संबंधित निर्णय प्रक्रियेत नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!