
दैवज्ञ कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८५ हून अधिक खेळाडूंचा सहभाग
फोंडा : अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघटना आणि फोंडा दैवज्ञ ब्राह्मण समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या दैवज्ञ कॅरम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २६ जुलै रोजी फोंडा येथील दैवज्ञ सभागृहात झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील ८५ हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. गोवा कॅरम असोसिएशनचे स्पर्धेला सहकार्य लाभले.
अखिल गोमंतकीय दैवज्ञ ब्राह्मण युवा संघटनेच्या सचिव संपदा अमेय नागवेकर आणि फोंडा दैवज्ञ ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष दीपक लोटलीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त अधीक्षक अभियंता सुनील पांडुरंग कारेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शौर्य प्रज्योत चोडणकर याचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या मुलांच्या गटात आरुष लोटलीकर विजेता, तर श्रीयान वेर्णेकर उपविजेता ठरला. महिला गटात अलका चोडणकर यांनी विजेतेपद, तर श्रुती वेर्णेकर यांनी उपविजेतेपद पटकावले. ज्येष्ठांच्या गटात श्यामराव रायकर विजेते आणि गिरीश बांदोडकर उपविजेते ठरले. पुरुष गटात राहुल लोटलीकर यांनी विजेतेपद पटकावले, तर ऋत्विक नागझरकर उपविजेते ठरले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे प्रायोजक, खेळाडू, स्वयंसेवक आणि समर्थकांचे आयोजकांनी आभार मानले. संघटनेचे खजिनदार राहुल लोटलीकर यांच्या आभार प्रदर्शनाने स्पर्धेची सांगता झाली.


