
‘लहानपण देगा देवा’त रोहित खांडेकरची छाप
पणजी (प्रतिनिधी):
पद्मश्री महेश काळे यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लहानपण देगा देवा’ या भक्तिसंगीत चित्रफितीत गोमंतकीय अभिनेता रोहित खांडेकर प्रमुख भूमिकेत झळकला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या प्रसिद्ध अभंगावर आधारित या चित्रफितीला समाजमाध्यमांवर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, रोहितच्या अभिनयाचेही विशेष कौतुक होत आहे. ‘सोलक्राफ्ट फिल्म्स’ने या संगीतचित्रफितीची निर्मिती केली आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत आणि भक्तिसंगीतातील वैशिष्ट्यपूर्ण गायकीसाठी ओळखले जाणारे महेश काळे यांनी या अभंगाला स्वर दिले आहेत. अभंगातील भावविश्वाला दृकश्राव्य रूप देणाऱ्या या चित्रफितीत रोहितच्या अभिनयालाही महत्त्वाचे स्थान आहे. चित्रफीत प्रदर्शित झाल्यानंतर संगीत आणि दृश्यात्मक मांडणीबरोबरच त्याच्या अभिनयाबद्दलही समाजमाध्यमांवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विशेष म्हणजे, महेश काळे यांनी स्वतः रोहितच्या अभिनयाची दखल घेत त्याचे कौतुक केले आहे. “तुझ्यामुळे या संगीतचित्रफितीचा प्रभाव आणखी उंचावला,” अशा शब्दांत काळे यांनी त्याच्या कामाची प्रशंसा केली. चित्रफितीचे दिग्दर्शक आरदी यांनीही रोहितच्या अभिनयाचे कौतुक करत त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव आनंददायी असल्याचे म्हटले आहे.

“महेश काळे सरांसोबत काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. त्यांच्याकडून आणि दिग्दर्शकाकडून मिळालेली दाद अभिनेता म्हणून अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देणारी आहे,” अशी प्रतिक्रिया रोहितने व्यक्त केली.
रोहितने यापूर्वी ‘डीकोस्टा हाऊस’ आणि ‘ग्लोरी’ या कोकणी चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘घर’सह अन्य कोकणी लघुपटांतही तो प्रमुख भूमिकेत दिसला आहे. अभिनयाबरोबरच निवेदक म्हणूनही तो गोव्यात परिचित आहे. त्याचप्रमाणे गोव्यात सध्या लोकप्रिय झालेल्या ‘देश-राग’ या बाळा राया मापारीच्या आयुष्यावरील कोंकणी नाटकांमध्येही रोहित प्रमुख भूमिकेत असून, त्या भूमिकेचेही कौतुक होत आहे.



