गोवा

गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. राजेंद्र गाड

पणजी : गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक प्रा. राजेंद्र गाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. प्रा. गाड २५ ऑगस्ट रोजी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.


माजी कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली. कुलगुरूपदासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांसह अन्य पात्र उमेदवारांचे सुमारे २०० अर्ज प्राप्त झाले होते. निवड समितीच्या शिफारशीनंतर प्रा. गाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


गोवा विद्यापीठात दीर्घकाळ अध्यापन करणाऱ्या प्रा. गाड यांना २०१९-२० या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले असून, १५ हून अधिक विविध प्रकल्पांसाठी मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे. ‘मल्टीव्हेरिएट सिग्नल्स अँड सिस्टिम्स’ आणि ‘कॉम्प्युटर नेटवर्क’ हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.


५३ वर्षीय प्रा. राजेंद्र गाड हे बार्देश तालुक्यातील कामुर्ली गावचे रहिवासी आहेत. गोवा विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यापीठाची प्रतिष्ठा अधिक बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे त्यांनी नियुक्तीनंतर सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!