अर्थमत/ टेक्नॉलॉजीलेख

हातमागावरील प्रेम वाढले; मात्र वापर आणि देखभालीची चिंता कायम

मुंबई : भारतीयांच्या मनात हातमागाच्या वस्त्रांविषयी मोठे आकर्षण असले, तरी त्यांचा प्रत्यक्ष वापर आणि त्यांची देखभाल यामध्ये मोठी तफावत असल्याचे ‘हँडलूम डिलेमा’ या ग्राहक अभ्यासातून समोर आले आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हा अभ्यास प्रसिद्ध केला. ट्वेन्टिफाय इंडियाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या अभ्यासात देशातील आठ शहरांमधील १,५०० हून अधिक ग्राहक सहभागी झाले होते.


अभ्यासानुसार, सुमारे ८० टक्के भारतीयांना हातमागाची वस्त्रे आवडतात, तर नव्या पिढीतही त्याबद्दलचे आकर्षण वाढत आहे. विशेष म्हणजे हातमागाविषयीच्या प्रेमात ‘जनरेशन झी’ने ‘जनरेशन एक्स’ला मागे टाकल्याचे अभ्यासात दिसून आले.


मात्र, ८१ टक्के ग्राहकांना हातमागाच्या कापडांविषयी पुरेशी माहिती नसल्याचे आढळले. तसेच त्यांची निगा राखणे हेही ग्राहकांसाठी मोठे आव्हान आहे. सुमारे ७० टक्के ग्राहक हातमागाची वस्त्रे हाताने धुतात किंवा ड्रायक्लीनिंगचा पर्याय निवडतात. त्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो. परिणामी, हातमागाची वस्त्रे दैनंदिन वापरापेक्षा विशेष प्रसंगांसाठी राखून ठेवली जातात. कौटुंबिक समारंभ (७१ टक्के), सण-उत्सव (६९ टक्के), देवदर्शन (६७ टक्के) आणि लग्नसमारंभ (६४ टक्के) यांसाठी त्यांचा वापर अधिक केला जातो, तर दैनंदिन वापराचे प्रमाण केवळ ३६ टक्के आहे.


तरीही हातमागाच्या पुनरुज्जीवनासाठी आशादायक चित्र दिसते. हातमागाची वस्त्रे सहज आणि सुरक्षितपणे धुता आली, तर ९७ टक्के ग्राहक त्यांचा अधिक वापर आणि खरेदी करतील, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.


या पार्श्वभूमीवर गोदरेज अप्लायन्सेसने आपल्या एआय-सक्षम फ्रंट-लोड वॉशिंग मशीनमध्ये ‘हँडलूम फ्रेंडली जेंटल वॉश’ हे वैशिष्ट्य सादर केले आहे. भारतातील २५ हून अधिक प्रकारच्या हातमागाच्या कापडांवर या सुविधेची चाचणी करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. प्रत्येक कापडावर २५ वॉश सायकल्सपर्यंत प्रक्रिया करून दृश्य तसेच ४० पट मॅग्निफिकेशनखाली सूक्ष्म परीक्षण करण्यात आले.


हातमागाच्या वारशाला ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होऊ शकते, हा या अभ्यासाचा महत्त्वाचा निष्कर्ष म्हणता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!