एकतेचा संदेश देणारा ‘अनेक’
मुंबई :
भारतीय चित्रपट उद्योगासाठी अनेक अज्ञात विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या आयुष्मान खुराणाने रूपेरी पडद्यावर आपले मजबूत अस्तित्व सिद्ध केले आहे. तसेच कोट्यवधी प्रेक्षकांची मनेही त्याने जिंकली आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शोमध्ये आयुष्मान खुराणा आपल्या आगामी ‘अनेक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार अँड्रिया केविचुसा आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत आला होता. या त्रिकुटाने चित्रपटाबाबत संवाद साधला तसेच त्यामागील संदेशही उलगडून दाखवला.
आयुष्मान पासून संवादाला सुरुवात झाली. होस्ट कपिल शर्माच्या हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे, या प्रश्नाला त्याने उत्तर दिले. आयुष्मान म्हणाला, ”’अनेक’मध्ये एक संदेश देण्यात आला आहे. तो म्हणजे, आपल्या देशात लोक अनेकविध धर्मांचे पालन करतात, वेगवेगळ्या भाषा बोलतात, वेगवेगळी वेशभूषा करतात, तरीही त्यांच्यात एकसमान जोश वा उत्साह असतो. ‘अनेकता में एकता’ हा आमच्या चित्रपटाचा संदेश आहे.
ईशान्य भारतात चित्रीकरणाबाबतही आयुष्मानने संवाद साधला. तो म्हणाला, “या भागात चित्रीकरणादरम्यान आम्ही खूप मौज केली. ही अत्यंत सुंदर जागा आहे. हा प्रदेश अद्याप अस्पर्शित राहिलेला आहे. आम्ही आसाम, मेघालय आणि शिलाँगमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण केले. हा भाग ‘पूर्वेकडील स्कॉटलँड’ म्हणून ओळखला जातो. इतकेच नव्हे तर एक पर्यटक म्हणून तुम्ही तिकडे गेलात तरी तुमच्यासाठी हा अत्यंत आनंददायी अनुभव ठरेल. भारतीय चित्रपट उद्योगासाठी ही अतिशय अस्पर्शित भूभाग आहे. येथे काम करताना आम्हाला खूप मजा आली!”