सिनेनामा 

हेमा सरदेसाई यांच्या स्वरांमध्ये ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’ नव्या रूपात

निर्माते-संगीतकार ‘हिंदुकुश’ यांची संकल्पना; मडगावच्या ‘स्टुडिओ हर्षल’मध्ये रेकॉर्डिंग

पणजी:  गणरायाची सर्वात प्राचीन आणि प्रभावी प्रार्थना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘श्री गणपती अथर्वशीर्षा’ला आता एक समकालीन संगीतमय रूप लाभले आहे. नव्वदच्या दशकापासून आपल्या वेगळ्या धाटणीच्या व भारदस्त आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका ‘गोवा विभूषण’ हेमा सरदेसाई यांच्या मधुर आणि भावपूर्ण स्वरांमध्ये हे अथर्वशीर्ष नुकतेच ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर युवा पिढी म्हणजेच ‘जेन-झी’ला परंपरेशी जोडणारा हा संगीतमय व्हिडिओ आता हिंदुकुश यांच्या यू-ट्यूबवर चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रपट तसेच प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी प्रॉडक्शनशी निगडित असलेले निर्माते-संगीतकार ‘हिंदुकुश’ यांनी या कलाकृतीची निर्मिती व संगीत संयोजन केले आहे. मडगाव येथील ‘स्टुडिओ हर्षल’मध्ये सलग पाच तास चाललेल्या सत्रात या स्तोत्राचे रेकॉर्डिंग पूर्ण करण्यात आले. आविष्कार भारद्वाज आणि मेहकांक्ष कथुरिया यांनी या व्हिडिओचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

अथर्वशीर्षातील शांतता आणि ध्यानस्थ भाव जपण्याचा प्रयत्न: हेमा सरदेसाई

या अनोख्या प्रयोगाविषयी भावना व्यक्त करताना हेमा सरदेसाई म्हणाल्या, “या रचनेची निर्मिती करताना श्री गणपती अथर्वशीर्षातील मूळ शांत, पवित्र आणि ध्यानस्थ करणारा भाव तंतोतंत जपण्यात आला आहे. आजच्या समकालीन श्रोत्यांना आणि विशेषतः नव्या पिढीला एका प्राचीन प्रार्थनेचे महत्त्व कळावे, तिच्याशी त्यांचे नाते जुळावे, हा यामागचा उद्देश आहे. हे गाताना मला जराही थकवा जाणवला नाही; उलट हा माझ्यासाठी अत्यंत ध्यानस्थ आणि तृप्त करणारा अनुभव होता.”

संस्कृत उच्चारांचा अचूक रियाज आणि सलग पाच तास रेकॉर्डिंग

संगीतकार ‘हिंदुकुश’ यांनी या अनुभवाबद्दल सांगितले, “माझा हा पहिलाच प्रयत्न असल्याने हेमा सरदेसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ गायिका यासाठी तयार होतील का, अशी धास्ती सुरुवातीला वाटत होती. मात्र, संकल्पना ऐकताच त्या अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी केवळ शब्द न गाता, प्रत्येक ओळीचा भावार्थ समजून घेतला. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व आणि अचूक शब्दोच्चार श्रोत्यांना नक्कीच मंत्रमुग्ध करतील. सलग पाच तास त्यांनी पूर्ण एकाग्रतेने त्यांनी हे गायन पूर्ण केले.”

ध्वनिमुद्रणकार हर्षल झेवियर मस्कारेन्हास यांनीही या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “स्तोत्रातील आध्यात्मिक ऊर्जा टिपणे हे आमचे उद्दिष्ट होते. हेमाताईंनी शब्दोच्चार आणि सूक्ष्म स्वरांवर घेतलेली मेहनत या रचनेचे वेगळेपण अधोरेखित करते.”

अध्यात्माचे पावित्र्य आणि चित्रपटीय भव्यता यांचा समतोल साधत, प्रार्थनेच्या मूळ आत्म्याला कुठेही धक्का न लावता ही संगीतमय रचना साकारण्यात आली आहे. भक्तिभाव आणि आधुनिक संगीत यांचा हा मिलाफ सर्व वयोगटातील श्रोत्यांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!