
‘यांना’ जाहीर झाले कोंकणी भाशा मंडळाचे पुरस्कार…
मडगाव : कोंकणी भाषा, साहित्य, पत्रकारिता, शिक्षण तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत कोंकणी भाशा मंडळाने यंदाचे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. मंडळाच्या ६४व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कोंकणी भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यामध्ये गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये सेवा, शिक्षक, पत्रकारिता, स्तंभलेखन, कार्यकर्ते, युवा साहित्य, युवा उद्योजिका, बाल साहित्य आणि साहित्य अशा विविध पुरस्कारांचा समावेश आहे.
सेवा पुरस्कार
कोंकणी भाषा आणि समाजासाठी दीर्घकाळ केलेल्या योगदानाची दखल घेत फादर मायकल फेर्नांडीस, फादर लिनो फ्लोरिनांडो, सुरंगा मडकयकर, हिरू नायक आणि सुरेश कोलवेंकार यांना सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षण आणि पत्रकारितेतील योगदानाचा गौरव
शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी स्वाती नायक आणि सुचेता पै यांची शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल अतुल पंडित यांना पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे.
कोंकणीतील स्तंभलेखनासाठी ब्रदर जॉन आल्फान्सो यांना स्तंभलेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कार्यकर्ते, युवा साहित्य आणि उद्योजिकेचा सन्मान
कोंकणी भाषा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उल्हास गांवकार, रूपेश ठाणेकार आणि सुचिता नार्वेकार यांना कार्यकर्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
युवा पिढीतील साहित्यिक योगदानाची दखल घेत श्रद्धा गरड यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तर उद्योजकतेच्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौतमी रायकार यांना युवा उद्योजिका पुरस्कार देण्यात येणार आहे.
बालसाहित्य क्षेत्रातील पुरस्कारासाठी श्रीकांत नागवेंकर यांच्या ‘नवलांच्यो विज्ञान कथा’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.
तीन साहित्यिकांना साहित्य पुरस्कार
यंदाच्या साहित्य पुरस्कारासाठी तीन पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. रूपा राजेश केणी यांच्या ‘विजमीत आनी हेर कथा’ या कथासंग्रहाला साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
फादर रोमन रॉड्रिगीस यांच्या रोमी लिपीतील ‘धागे’ या पुस्तकाचीही साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच शीतल नंदकुमार परब यांच्या ‘गांवां कडल्यो कविता’ या कवितासंग्रहाला साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
अनुवाद पुरस्कार यंदा नाही
यंदाच्या वर्षी योग्य पुस्तक उपलब्ध न झाल्यामुळे अनुवाद पुरस्कार देण्यात येणार नसल्याचे कोंकणी भाशा मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोंकणी भाषेच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या साहित्यिक, शिक्षक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, युवा लेखक आणि उद्योजक यांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. मंडळाच्या ६४व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात यंदाच्या सर्व पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.





