लेख

डिझाइन गुरुच्या अंतरंगातला ‘कॉमन मॅन’

​​- यशोधरा काटकर

प्राध्यापक सुधाकर नाडकर्णी हे भारता​तील डिझाइन शिक्षणाचे जनक आणि संस्था -निर्माता मानले जातात. त्यांनी व्यावसायिक डिझाइन क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली ,त्या अनुषंगाने डिझाइन शिक्षणाचा पाया रचला आणि अनेक नामांकित राष्ट्रीय संस्थांची उभारणी केली. आपली सगळी हयात डिझाइन क्षेत्रात नवनवे उपक्रम रुजवून, नवे पायंडे पाडणाऱ्या, आयआयटी( मुंबई) आणि (गुवाहाटी )येथे इंडस्ट्रियल डिझाइन शिक्षणाला नवी गती देणाऱ्या, ‘डिझाइन थिंकिंग’ विचारधारा व्यवस्थापन शिक्षणात रुजवणार्‍या आणि नव्वदीतही विलक्षण उत्साहाने कार्यरत असणार्‍या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने २० ऑक्टोबरला मुंबईत अखेरचा श्वास घेतला हे अजूनही खरे वाटत नाही .

कॉमन मॅन की सुपरमॅन

माझी आणि सरांची पहिली भेट मला स्पष्ट आठवते . काळा टी-शर्ट, जीन्स परिधान केलेले सर,लांबलचक कॉरिडॉरमधून तुरुतुरु चालत येत होते. जणू आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन टाइम्सच्या पहिल्या पानावरून निसटून समोरून येत होता ,हुबेहूब तोच .पण काळा टी -शर्ट आणि जीन्स घालून , शिवाय नेहमीच्या चिंताग्रस्त मुद्रेने नव्हे तर हास्याने उजळून निघालेल्या चेहर्‍याने .मी बघतच राहिले, त्यात औपचारिक ड्रेसकोडची शिस्त पाळणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये ते अगदीच विपरीत दृश्य होते. विचारले,” हे कोण ?”

“हे बिजनेस डिझाईनचे डीन एमेरिटस, प्रोफेसर सुधाकर नाडकर्णी ,हॅलो हॅलो नाडू सर…”

“नाडू ?एवढ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही नाडू म्हणता ?”

“ऑफ कोर्स ,ही लव्हज इट “

मी थक्क होऊन बघत राहिले पण त्या धक्क्यातूनचं सगळी संगती पटापट लागत गेली संस्थेच्या प्रवेशद्वारापासून ,लॉबी ,ऑडिटोरियम, कॉन्फरन्स रूम प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या डिझाईनची छाप स्पष्ट उमटली आहे तेच हे नाडकर्णी सर.अर्थात त्यांचा हा प्रभाव संस्थेच्या केवळ बाह्य रूपापर्यंत मर्यादित नव्हता. २००३ साली सर आयआयटी ( गुवाहाटी)हून मुंबईला परतले तेव्हा वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (WeSchool) चे व्यवस्थापन क्षेत्रात हा विषय प्रविष्ट करण्याचे निमंत्रण स्वीकारून त्यांनी ’ डिझाइन थिंकिंग’ केन्द्र्स्थानी असणार्‍या ‘बिझनेस डिझाइन’या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची रचना केली होती .ज्या काळात नवनिर्मिती ,उद्योजकता ,स्टार्ट-अप या संकल्पना देशाच्या क्षितिजावर उगवल्याही नव्हत्या त्या काळात सरांनी त्यांची बीजे आधीच रोवली होती. यातून ‘डिझाईन थिंकिंग’

ही तत्वप्रणाली शिक्षणात रूजली आणि व्यवस्थापन शिक्षणातून केवळ नोकरीपेशा व्यवस्थापकांऐवजी नवनिर्मितीच्या विचाराने भारलेले धाडसी उद्योजक निर्माण होत गेले.संस्थेच्या कानाकोपर्‍यात प्रतिबिंबीत होणारे डिझाइन हे त्या तत्वप्रणालीला ठळकपणे अधोरेखित करणारे होते .

पण हे सगळे घडले कसे ?

नाडकर्णी सरांचा जन्म सावंतवाडी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वर्ष होते १९३६. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची प्रचंड आवड . शाळेचे मासिक सजवणे किंवा शेजारच्या साईनबोर्ड पेंटरला मदत करणे यातून त्यांची कला क्षेत्रातील गोडी वाढत गेली.मध्य मुंबईतल्या गंगाधर निवास या चाळीत त्यांचे बालपण गेले.चाळीतल्या रहिवाशांसाठी गच्ची हे परस्पर संवादाचे महत्वाचे केंद्र होते. यात सर्वात महत्त्वाचा होता वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम .शाळकरी सुधाकरने रस्त्यांच्या चौकात कार्यक्रमाची आमंत्रणे रंगवली आणि हाताने फलक रंगवण्याचा सराव सुरू केला.त्या काळी गिरगाव ते दादर भागात असंख्य साईनबोर्ड चित्रकार कार्यरत होते . काही जण अक्षरलेखन आणि टायपोग्राफीसाठी, तर काही जण आकृतीप्रधान चित्रांसाठी ओळखले जात. . डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वीचा तो काळ होता पेंटर हाताने सिनेमाची पोस्टर्स, टायटल डिझाइन्स आणि होर्डिंग्ज रंगवत असत. सुधाकर शाळा सुटली की त्यांच्यासोबत मचाणावर चढून फलक रंगवायला मदत करत असे . ट्रेनमधून येताजाता दिसणार्‍या भिंती त्याला आकर्षित करत राहिल्या ,त्यावरच्या जाहिराती ,राजकीय -सामाजिक संदेश ,ग्राफिती त्याला भुलवत राहिली . विविध पार्श्वभूमीच्या हजारो लोकांच्या रोजच्या येण्याजाण्याच्या मार्गातले हे कला-अवकाश ,इथली कला संग्रहालयात प्रदर्शित कलेच्या विरुद्ध असते पण ती जनतेसाठी सहज उपलब्ध असते आणि अनेक अनामिक कलाकारांना प्रतिशोधाच्या भीतीशिवाय व्यवस्थेविरोधी अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देते. भिंतींवरील कला क्षणभंगुर असल्याने ही कला काळाच्या कसोटीवर टिकण्याच्या ओझ्याऐवजी लक्षवेधी , तात्काळ आणि प्रासंगिक असते हे कुठेतरी मनात रुजू लागले होते .अशी मनाची मशागत सुरू असताना त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमधून कमर्शियल/ग्राफिक डिझाईनचे उच्च शिक्षण (१९५४ -१९५९) पूर्ण केले. आणि चारचौघांप्रमाणे एका जाहिरात कंपनीत कामाला सुरुवात केली.

वेगळी दिशा

पण पुढे त्यांना एक वेगळी दिशा खुणावू लागली आणि १९६२ साली ते जर्मनीतल्या उल्म इथल्या ‘स्कूल ऑफ डिझाइन’मध्ये इंडस्ट्रियल डिझाइनच्या अभ्यासक्रमासाठी दाखल झाले. त्यांच्यावर या स्कूलच्या वैज्ञानिक आणि मानवतावादी दृष्टिकोनाचा मोठा प्रभाव पडला. डिझाइन म्हणजे वस्तूंना आकार देणे वा सुशोभीकरण करणे नव्हे ,ती समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणारी एक प्रगल्भ विचारप्रणाली आहे,असली पाहिजे हे त्यांच्या मनीमानसी रुजत गेले .आपले डिझाइनचे ज्ञान केवळ श्रीमंत वर्गासाठी नव्हे, तर कॉमन मॅनच्या रोजच्या गरजा आणि सामाजिक प्रश्न सोडवणे यासाठी असले पाहिजे या उद्देशाने त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसची कामे केली आणि पुढची तब्बल साठ वर्षे ते हा विचार केन्द्रस्थानी ठेवून या कार्यक्षेत्रात तळपत राहिले . दिल्लीमधले मदर डेअरीचे दुधाचे बूथ आणि मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण ही त्यांची उल्लेखनीय कामे खूप नावाजली गेली.

व्यावसायिक आणि शिक्षक

त्यांनी भारतात परतल्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन( अहमदाबाद) येथे प्राध्यापक म्हणून काही काळ काम केले . १९६९ साली त्यांना आयआयटी (मुंबई) इथे एक स्वतंत्र डिझाइन विभाग निर्माण करण्याकरता पाचारण केले गेले . त्यांनी तिथे इंडस्ट्रियल डिझाइन सेन्टर (आयडीसी) ची स्थापन केले ,ही पारंपरिक चाकोरीबद्ध इंजिनिअरिंग पदवी शिक्षणक्षेत्रात क्रांतीच होती.डिझाइन हा केवळ इंजिनिअरिंगचा भाग नसून ,स्वतंत्र अभ्यास आणि उपयोजनाचा विषय आहे हा विचार त्यांनी रुजवला .

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासोबतच त्यांचे पर्यावरण, प्रदर्शन आणि उत्पादन डिझाइन या क्षेत्रांतही धडाडीने काम सुरू राहिले .त्यांनी केलेल्या प्रकल्पांमध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हजसाठी पंखा आणि रेग्युलेटरसारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनांपासून लार्सन अँड ट्यूबरो लिमिटेडसाठी केलेल्या स्विचगियर्ससारख्या औद्योगिक उत्पादनांचा समावेश आहे. जगप्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्यासह सॉल्ट लेकच्या सिटी सेंटरचे डिझाइन करताना कालीघाट चित्रकलेसारख्या पारंपरिक कलामूल्यांचा वापर, चेन्नईमधल्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीच्या डिझाइनमधल्या पर्यावरणाच्या विचारातून संशोधन आणि विकासासाठी निर्माण केलेल्या प्रेरणादायी वातावरणातून त्यांची उपक्रमशीलता , प्रयोगशीलता आणि दूरदृष्टी दिसून येते

त्यांनी शासनाच्या अनेक मोठ्या प्रदर्शन प्रकल्पांच्या माध्यमातून व्यापक समाजावर मोठा प्रभाव पाडला. ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’हे प्रदर्शन , फेस्टिवल ऑफ इंडियासाठी ‘विस्तार ‘ दालन आणि ‘गांधी स्मारक संग्रहालय’ सारखे प्रकल्प, आधुनिक संदर्भात भारतीय संस्कृतीचे नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रतिनिधित्व करण्याच्या क्षमतेसाठी विशेष उल्लेखनीय आहेत. या प्रकल्पांमध्ये सुलेखन, शिल्पकला, व्हिज्युअल डिझाइन, वास्तुकला आणि अभियांत्रिकी यांसारख्या डिझाइनच्या विस्तृत क्षेत्रातील सखोल संशोधन आणि समन्वयाचे दर्शन घडते ,

निवृत्त झाल्यावर…

तिथून १९९७ साली निवृत्त झाल्यावर त्यांच्यावर एक आव्हानात्मक जवाबदारी सोपवण्यात आली . ते आयआयटी (गुवाहाटी) इथे स्वतंत्र डिझाइन विभाग निर्माण करण्याकरता रुजू झाले .त्यांनी डिझाइन केवळ सुशोभीकरणाची कला न मानता ,विज्ञान ,तंत्रज्ञान आणि समाजशास्त्र यांचा समन्वय असणारे एक मॉडेल म्हणून विकसित केले. नाडकर्णी सरांची डिझाइन हा घटक समाजहितैषी आणि सर्वसमावेशक बनवण्याची क्षमता आयआयटी (गुवाहाटी) येथील त्यांच्या कामातून दिसून आली .जिथे मुंबई-पुण्याप्रमाणे देशी-परदेशी उद्योगांचे जाळे नव्हते,तिथे सरांनी आसाममध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूला सामाजिक परिवर्तनात्मक प्रक्रियेचा केंद्रबिंदू बनवून ,विविध उत्पादने विकसित करण्यामध्ये स्थानिक समाजाला सहभागी करून घेत ,त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन निर्माण केले.त्यांनी ब्रम्हपुत्रावरील ‘तरंगत्या हॉस्पिटल्स’साठी निर्माण केलेले फर्निचर ही या सामाजिक विचाराची पुढची पायरी होती.

व्यावसायिक -शैक्षणिक कार्यकक्षेपलीकडे

भारत सरकारच्या ‘इंडस्ट्रियल डिझाइन कमिटी’ मध्ये त्यांची एक महत्त्वपूर्ण सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; या समितीद्वारे राष्ट्रीय डिझाइन धोरण निश्चित केले जात असे.त्यांनी ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सोसायटीज ऑफ इंडस्ट्रियल डिझाइन’ (ICSID) चे सक्रिय सदस्य म्हणून काम केले.. १९७९ मध्ये भारतात आयोजित ऐतिहासिक ‘ICSID/UNIDO’ परिषदेमागे असलेल्या प्रमुख दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींपैकी ते एक होते. या परिषदेतून ‘अहमदाबाद डिक्लेरेशन अस्तित्वात आले, ज्यातून जगासमोर ‘विकासासाठी डिझाइन’ ही संकल्पना मांडली गेली.

विचारधन

त्यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला ‘ बाय डिझाइन :वर्क्स +थॉटस ‘ हा ग्रंथ असो ,वा त्यांची प्रदीर्घ मुलाखत असणारा ‘द डिझाइन जर्नी’ वाचताना मन थक्क होते .कारण इथे केवळ सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या डिझायनरचा वैयक्तिक प्रवासच नव्हे, तर स्वातंत्र्योत्तर भारतातील डिझाइन व्यवसायक्षेत्राच्या विकासाचा प्रवास उलगडत जातो . सरांची स्वागतशीलता , सहानुभूती, सर्वसमावेशकता, नम्रता, अनेक दशके शिकण्याची आणि समकालीन राहण्याची क्षमता, आव्हानांवर मात करण्याचे धाडस, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आणि सहयोगाची भावना या सगळ्या वैशिष्ठ्यांना इथे उजाळा मिळाला आहे. त्यातून काळाच्या एक मोठ्या खंडात त्यांनी डिझाइन उपयोजन ,डिझाइन शिक्षण तसेच व्यवस्थापन -बिझनेस शिक्षणात घडवलेल्या परिवर्तनाचे व्यापक दर्शन घडत जाते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या तीन पिढ्या घडवून आपल्या वैयक्तिक शैलीच्या डिझाइनप्रणालीचे एक ‘खानदान ‘ जोपासले आहे,त्याचे प्रत्यंतर हा ग्रंथ वाचताना ठायी ठायी येत राहते.

मानसन्मान आणि पुरस्कार

शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून डिप्लोमा करत असताना, त्यांच्या उत्कृष्ट प्रोजेक्टसाठी त्यांना राज्य पदक ते पुणे डिझाइन फेस्टिव्हल + मध्ये ‘ महागुरु ऑफ डिझाइन ‘ही सर्वोच्च पदवी असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले . डिझाइन अध्यापनशास्त्र प्रगत करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेले योगदान आणि भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी व व्यावसायिक विद्यापीठांमध्ये डिझाइनचा समावेश करून संस्था-निर्माता म्हणून बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्यांना ‘एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (MIT ADT) युनिव्हर्सिटी’तर्फे मानद ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ पदवी देऊन गौरव करण्यात आला ।

त्याच्या पश्चात पत्नी उल्काताई, मुलगी सुहिता, मुले आदित्य, नंदन आणि त्यांचे परिवार आणि जगभर पसरलेले त्यांचे अगणित नामांकित सहधर्मी, सहकर्मी,नाट्यकर्मी आणि विद्यार्थी असा मोठा परिवार आहे.. या परिवारात त्यांनी मलाही सामील करून घेतले हा त्यांचा मोठेपणा. संस्थेमधल्या त्यांच्या अगणित प्रोजेक्ट्समध्ये माझा अल्प का होईना सहभाग होताच शिवाय त्यांचे बंधू कमलाकर नाडकर्णी यांचं ‘महानगरी नाटकं’ तसेच मित्रवर्य अभिनेते डॉक्टर हेमू अधिकारी यांच्या ‘नाट्य समाजेन विज्ञानेन ‘ पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ” यशोधरा ,आता पुढचं तू बघून घे ” म्हणून आमच्यावर सोपवून ते निर्धास्त झाले.नाडूचे कार्य म्हणजे आपलेच म्हणून सगळी टीम कामाला लागली आणि कार्यक्रम यशस्वी झाले.

असे हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले तेव्हा आयआयटी (गुवाहाटी )मधल्या त्यांच्या सुहृदानी संस्थेतल्या कॉन्फरन्स हॉलचे ‘प्रो सुधाकर नाडकर्णी कॉन्फरन्स हॉल’असे नामकरण केले ,शिवाय त्यांच्या नावाने पारिजातकाचे रोपटे लावून आगळी आदरांजली वाहिली. जेव्हा अशी द्रष्टी व्यक्ती जग सोडून जाते तेव्हा तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे’ मागे उरले ते शब्द’, त्याचे बोलणे, विचार आणि दिलेले ज्ञान इतरांच्या रूपाने पुढे चालत राहते.सरांचे अगणित विद्यार्थी त्यांचा वारसा पुढे नेतीलच पण माझ्यासारख्या कित्येकांना त्यांचा साधेपणा , सर्वांना आपलेसे करून घेण्याची सहज प्रवृत्ती ,नाविन्याचा ध्यास आणि उपक्रमशीलता चेतना देत राहील .

नाडकर्णी सरांना आदरांजली…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!