
IFFI 2026 : इफ्फीमध्ये यंदा चित्रपटांमागच्या चित्रपटांचीही गोष्ट
'फिल्म्स अबाऊट फिल्म्स’ या नव्या विभागाची भर
पणजी : चित्रपट म्हणजे पडद्यावर दिसणारी कथा एवढेच त्याचे स्वरूप नसते. त्या कथेच्या निर्मितीमागे असलेला दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, त्याचा संघर्ष, कलात्मक महत्त्वाकांक्षा, सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि अनेकदा पडद्यावर न येऊ शकलेल्या कथाही चित्रपटाच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असतात. याच पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा प्रथमच ‘फिल्म्स अबाऊट फिल्म्स’ या विशेष विभागाची सुरुवात करण्यात येणार आहे. या विभागात दहा देशांतील पाच आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
२० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात होणाऱ्या इफ्फीची यंदाची मध्यवर्ती संकल्पना ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ अशी आहे. त्याच संकल्पनेला साजेसा हा नवा विभाग असून, चित्रपटांच्या निर्मितीमागच्या कहाण्या, चित्रपट निर्मात्यांचे जीवन, कलाकारांचे अनुभव आणि इतिहासाच्या पडद्याआड राहिलेल्या चित्रपटांचा शोध या माध्यमातून घेतला जाणार आहे. नामवंत चित्रपट दिग्दर्शकांच्या सूचनेनंतर चित्रपट निर्मितीच्या कलेवर आणि प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने हा विभाग सुरू करण्यात आला आहे.
या विभागातील पहिला चित्रपट म्हणजे बार्नाबी थॉम्पसन दिग्दर्शित ‘मॅव्हरिक : द एपिक अॅडव्हेंचर्स ऑफ डेव्हिड लीन’. ब्रिटन आणि अमेरिकेच्या संयुक्त निर्मितीतील हा माहितीपट जागतिक चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचे दिग्दर्शक डेव्हिड लीन यांच्या जीवनाचा आणि कारकिर्दीचा मागोवा घेतो. भव्य चित्रपटांची निर्मिती, दृश्यात्मकतेबाबतचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन आणि चित्रपट माध्यमाच्या मर्यादा ओलांडण्याची त्यांची धडपड यांचा वेध घेतानाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षही या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचा कालावधी १०५ मिनिटे आहे.
रशियन चित्रपट ‘सिडनी लुमेट्स बर्थडे’ हा राऊल गेइदारोव दिग्दर्शित चित्रपट कौटुंबिक नातेसंबंध आणि किशोरवयीन आयुष्यातील भावनिक गुंतागुंत मांडतो. जॉर्जियातील १७ वर्षीय दातो हा आपल्या आजीसोबत राहत असतो. एकेकाळी मोठे कुटुंब असलेल्या घरात आता मोजकीच माणसे उरली आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकाळ दूर राहिलेली त्याची आई अचानक परतते आणि त्याचे आयुष्य बदलून जाते. कुटुंबातील नात्यांमधील ताणतणाव, वाढत्या वयातील भावनिक संघर्ष आणि कठीण परिस्थितीतही माणूस म्हणून टिकून राहण्याची धडपड हा या चित्रपटाचा गाभा आहे.
जॉर्जिया, एस्टोनिया, तुर्की, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेच्या संयुक्त निर्मितीतील ‘सपोर्टिंग रोल’ हा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. आना उरुशाद्झे दिग्दर्शित या चित्रपटात दीर्घ विश्रांतीनंतर अभिनयक्षेत्रात परतणाऱ्या एका ज्येष्ठ जॉर्जियन अभिनेत्याची कथा आहे. आपल्या कारकिर्दीत नेहमी नायकाच्या भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याला एका नवोदित दिग्दर्शकाच्या चित्रपटात मात्र दुय्यम भूमिका मिळते. सुरुवातीला नाखूष असलेला अभिनेता हळूहळू त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊ लागतो. कलाकार आणि त्याने साकारलेली व्यक्तिरेखा यांच्यातील सीमारेषा पुसट होत जाण्याचा अनुभव हा चित्रपट देतो. या चित्रपटाचा कालावधी १३९ मिनिटे आहे.
रुबिका शाह दिग्दर्शित ‘द मॅड डॉग ऑफ युरोप’ हा माहितीपट एका अपूर्ण राहिलेल्या चित्रपटाच्या इतिहासाचा मागोवा घेतो. १९३२ मध्ये पटकथाकार हरमन जे. मॅन्किव्हिक्झ यांनी हिटलर आणि नाझीवादाच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर एका जर्मन-ज्यू कुटुंबाची कथा लिहिली होती. मात्र, राजकीय दबाव आणि व्यावसायिक हितसंबंधांमुळे हॉलिवूडमध्ये या पटकथेवर चित्रपट निर्माण होऊ शकला नाही. फ्रान्स आणि जर्मनीच्या संयुक्त निर्मितीतील हा ८३ मिनिटांचा माहितीपट एका चित्रपटाची निर्मिती का रोखली गेली, याचा शोध घेतो. चित्रपटसृष्टी आणि राजकीय सत्ताकेंद्रे यांच्यातील संबंधांचा विचार करण्यास भाग पाडणारा हा विषय आहे.
या विभागातील पाचवा चित्रपट म्हणजे फ्रान्सेस्को झिपेल दिग्दर्शित ‘व्हिटोरिओ डी सिका – स्टेजिंग लाइफ’. इटालियन चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक आणि अभिनेते व्हिटोरिओ डी सिका यांच्या जीवनकार्याचा वेध या माहितीपटात घेतला आहे. दुर्मीळ संग्रहित दृश्यफिती, कुटुंबीयांशी साधलेला संवाद तसेच समकालीन चित्रपट दिग्दर्शक आणि कलाकारांच्या आठवणींच्या माध्यमातून डी सिका यांचा चित्रपटप्रवास उलगडण्यात आला आहे. इटलीची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा कालावधी १०० मिनिटे आहे.
ब्रिटन, अमेरिका, रशिया, जॉर्जिया, एस्टोनिया, तुर्की, स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इटली अशा दहा देशांतील निर्मिती आणि सहनिर्मितीचे हे पाच चित्रपट आहेत. या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेचे केवळ तांत्रिक पैलू न मांडता त्यामागील माणसे, त्यांचे अनुभव, सामाजिक-राजकीय संदर्भ आणि कलात्मक संघर्ष यांनाही महत्त्व देण्यात आले आहे.
चित्रपट पाहण्याबरोबरच चित्रपट कसा जन्माला येतो, एखाद्या कलाकृतीमागे कोणत्या प्रेरणा आणि संघर्ष असतात, याचा शोध घेण्याची संधी या नव्या विभागामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजही असतो, याची जाणीव करून देणारा हा उपक्रम इफ्फीच्या यंदाच्या कार्यक्रमातील महत्त्वाचा बदल ठरणार आहे.







