राज्यात ‘एवढ्या’ मसाज पार्लरचीच नोंदणी!
पणजी :
राज्यात केवळ 166 स्पा-मसाज पार्लर हे नोंदणीकृत आहेत. गेल्या दहा वर्षात पाच मसाज पार्लरचा परवाना रद्द केला गेला आहे. हे परवाने मसाज पार्लरच्या मालकांनी स्वतः अर्ज करून रद्द करवून घेतले आहेत. परंतु गेल्या दहा वर्षात, बेकायदेशीर कृत्यात सहभागी असल्याच्या कारणाने एकही मसाज पार्लर बंद झालेला नाही, अशी माहिती ‘अर्ज’ या संस्थेने माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळवली आहे.
अर्ज (अन्याय रहित जिंदगी) ही स्वयंसेवी संस्था 1998 पासून व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणाऱ्या मानवी तस्करीविरोधात काम करते. त्याशिवाय ही संस्था लैंगिक शोषणातून सुटका करून राज्याच्या संरक्षणात असलेल्या महिला आणि मुलींना पुनर्वसन सेवाही पुरवते. मसाज पार्लरवर छापा टाकताना पोलिसांना ‘अर्ज’ वेळोवेळी साहाय्य करते.
‘अर्ज’ च्या माहितीनुसार, बहुतेक मसाज पार्लर आरोग्यविषयक अनिवार्य असलेल्या नियमांचे पालन अजिबात करत नाहीत. ‘अर्ज’च्या निरीक्षणानुसार गोव्यातले स्पा आणि मसाज पार्लर हे व्यावसायिक लैंगिक शोषणाचे आणि खंडणी उकळण्याचे अड्डे बनले आहेत. गोवा तसेच भारताच्या विविध भागातून- मणिपूर, नागालँड, मिझोराम, पश्चिम बंगाल तसेच नेपाळ, थायलंड या देशातून तस्करी करून त्यांना पार्लरमधून कामासाठी वापरले जात होते.
मुख्यमंत्र्यांनी मसाज पार्लरविरुद्ध जी कडक भूमिका सध्या स्वीकारली आहे, त्याचे ‘अर्ज’ने स्वागत केले आहे, अशा अवैध कृत्यात गुंतलेले पार्लर आणि स्पा बंद करून गुन्हेगारांना त्या परिसरात मज्जाव करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी केली आहे.