मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर कदंबची बससेवा
मोपा येथील ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ गुरुवार 5 जानेवारीपासून कार्यरत होणार आहे. हैदराबादहून गोव्यात येणारे इंडिगोचे विमान येथे उतरणारे पहिले विमान असेल. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास विमान उतरण्याची शक्यता आहे. तसेच पहिल्या दिवशी 11 विमाने येणार आहेत. त्यामुळे आता या मार्गावर कदंब महामंडळ प्रवाशांसाठी इलेक्ट्रिक बसेस चालवणार आहे. याबाबतचे वेळापत्रक आणि तिकीटदर महामंडळाने जाहीर केले आहे.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मडगांव व्हाया पणजी या मार्गावर कदंब महामंडळ इलेक्ट्रिक बसेस चालवणार आहे. तसेच सिकेरी ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हाया कळंगुट, म्हापसा या मार्गावर बसेस सुरु करण्यात येणार आहेत. महामंडळाने बसफेऱ्यांचे वेळापत्रक आणि तिकीटदर जाहीर केले आहेत. मोपा विमानतळ ते मडगाव मार्गावर सकाळी 8 वाजल्यापासून व मडगाव ते मोपा विमानतळ मार्गावर सकाळी 4 वाजल्यापासून बससेवा सुरु करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गावर 6 बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
सिकेरी व्हाया म्हापसा ते मोपा विमानतळ बससेवा सकाळी 5 वाजता तर मोपा विमानतळ व्हाया म्हापसा ते सिकेरी सकाळी 8 वाजल्यापासून बससेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मडगाव व्हाया पणजी ते मोपा विमानतळ 500 रुपये, मोपा व्हाया म्हापसा ते पणजी 250 रुपये, मोपा व्हाया कळंगुट ते सिकेरी 250 रुपये इलेक्ट्रिक बसचे तिकीटदर असणार आहेत.