‘रेवेका’ शाळेला सर्वोतोपरी मदत करणार’
सातारा (महेश पवार) :
वाई येथील रेवेका साहिल अक्षर इन्स्टिट्यूट या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे वक्तव्य बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विकास शिंदे यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात आरोग्य शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तुंचे वाटप, अनाथ आश्रमातील रुग्णांना फळे तसेच मेडीकल कीट वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. वाई येथील बधिरांच्या शाळेत पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते वह्या, पेन व खाऊ वाटप करण्यात आले. विकास शिंदे यांनी मनोगतामध्ये शाळेला भेडसावणाऱ्या समस्यांविषयी सांगून पुरुषोत्तम जाधव यांनी यात लक्ष घालून सहकार्य करण्याची विनंती केली. विशेषतः शाळेला आणखी शिक्षकांची आवश्यकता असल्याचे व्यवस्थापकांनी निदर्शनास आणून दिले. शाळेला आगामी काळात सर्वोतोपरी मदत करु, असे पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देवून मान्यवरांचे स्वागत केले.