राज्यातील सरकार हे ‘विवा बोणो सरकार’ : काँग्रेस
पणजी :
पर्यटन खात्याने व्यस्त रस्त्यावर कार्निव्हल परेड आयोजित केली आहे. भाजप सरकारने धार्मिक भावनांचा अपमान करणे आणि वाहतूक कोंडी निर्माण करणे थांबवावे, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे.
गोवा पर्यटन खात्याने समाज माध्यमांवर जारी केलेल्या जाहिरातीतील “चर्चचा चुकीचा उल्लेख” आणि “म्हापसा मिरवणुकीचा रस्ता” यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, कॅप्टन फर्नांडिस यांनी “विवा बोणो सरकार” असे म्हणत टोला लगावला आहे.
पर्यटन खात्याने समाज माध्यमांवर जारी केलेल्या जाहिरातीत “होली स्पिरिट चर्च” ऐवजी “होळी स्प्रिट चर्च” असे लिहून ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावनांचा अपमान केला आहे. हे संघाच्या मार्गदर्शनाखालील सरकारने जाणीवपूर्वक केले आहे असा आरोप कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.
मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 रोजी हायकोर्ट ते म्हापसा बस स्टँड पर्यंतच्या म्हापसा कार्निव्हल परेड मार्गाचा संदर्भ देत कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आरोप केला की, पर्यटन मंत्री असलेले पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांचा अहंकारापोटीच एवढ्या लांब मार्गावर कार्निव्हल परेड आयोजित केली आहे.
सदर जाहिरात तात्काळ मागे घेण्यात यावी आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी गोमंतकीयांच्या धार्मिक भावनांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी माझी मागणी आहे. म्हापसा कार्नीवाल परेडचा लांबचा मार्गही बदलला पाहिजे, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.