‘शिंदेवाडीतील घटनेच्या रुपाने निसर्गाचा इशारा’
सातारा (महेश पवार) :
इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या महाबळेश्वर, तापोळा, पाचगणी, भिलार व कास परिसरात बेकायदेशीरपणे अमर्याद उत्खनन आणि बांधकामे होत आहेत. अमर्याद उत्खननामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून त्याचे प्रतिकूल परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे. पाचगणी नजिकच्या शिंदेवाडी, ता. जावली गावात अवकाळी पावसामुळे नुकत्याच घडलेल्या भयंकर घटनेच्या रुपाने निसर्गाने जणू माणसाला गर्भित इशारा दिला आहे. यातून प्रशासन आणि नागरिक धडा घेणार की नाही हाच खरा चिंतेचा विषय आहे.
सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वर, पाचगणी, भिलार, कास, तापोळा आदी पर्यटनस्थळांच्या निसर्गरम्य परिसरात गल्लाभरू बिल्डर्स आणि धनिकांनी अमर्याद उत्खनन, वृक्षतोड आणि बेकायदेशीर बांधकामांचा जणू सपाटा लावला आहे.
अमर्याद उत्खननामुळे होणारे प्रतिकूल परिणाम समोर येऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसात पाचगणी नजिकच्या शिंदेवाडी, ता. जावली गावात अचानकपणे दरीतून दगड मातीसह पाण्याचा लोट आल्याने ग्रामस्थांची पाचावर धारण झाली. गावाच्या वरच्या बाजुला खासगी बिल्डरने अमर्याद उत्खनन केले आहे.
त्यामुळे ओढ्याचा प्रवाह बदलला आणि गावात पाण्याचा लोट शिरला. सुदैवाने माळीण गावासारखी मोठी दुर्घटना होता होता वाचली. निसर्गाने मानवाला दिलेला हा इशारा मानावा लागेल. या घटनेने हादरून गेलेल्या शिंदेवाडी ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्याशी संपर्क केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिस्थितीचे गंभीर ओळखून शिवसेनेने तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बेकायदेशीर उत्खननप्रकरणी संबंधित बिल्डर विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. येथे आठ दिवसात कारवाई न केल्यास पाचगणी येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बेकायदेशीर उत्खनन वृक्षतोड आणि बांधकामांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून धडक कारवाई व्हावी अशी सातारा जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अनाधिकृत बांधकामे तोडण्याबरोबरच दोषींवर कडक कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी सचिन मोहिते यांनी केली आहे.