गोवा मंत्रिमंडळ फेरबदलाचा मुहूर्त ठरला…
पणजी :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील जागा जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फर्मागुढी-फोंडा येथील 16 एप्रिल रोजीच्या जाहीर सभेनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या नव्या माहितीनुसार, 10 मेपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच तसे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री सावंत यांनी आज आपला सुवर्णमहोत्सवी (50वा) वाढदिवस साजरा केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील.
सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथे 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच 10 मेपूर्वी गोवा मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात.
नव्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यात आलेक्स सिक्वेरा यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना मंत्रिमंडळात निश्चितच स्थान मिळेल, हे पक्के मानले जात आहे. दुसरे नाव आहे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे. तथापि, कामत हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यापेक्षाही केंद्रात भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.