डिचोलीत दोन वर्षात होणार 250 कोटींचे दोन बायपास
डिचोली :
उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यात दोन बायपास रस्ते होणार आहेत. त्यामुळे डिचोलीवासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या दोन्ही बायपासना मिळून 250 कोटी रूपये खर्च येणार आहे. हे दोन्ही बायपास चौपदरी असणार आहेत. 2025 पर्यंत हे बायपास पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
यातील पहिला बायपास आहे डिचोली बायपास. डिचोली बायपास हा 4.9 किलोमीटरचा मार्ग असून त्याला 90 कोटी रूपये खर्च आहे. तो बोर्डे आणि सर्वण या दोन ठिकाणांना जोडतो.
तर दुसरा बायपास हा असनोडा बायपास आहे. तो 2.9 किलोमीटरचा असून त्यासाठी 160 कोटी रूपये खर्च येणार आहे. हा मार्ग असनोडा मार्केट ते शिरगाव जंक्शन या ठिकाणांना जोडतो.
डिचोली बायपासच्या कामाला 2021 मध्येच सुरवात झाली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) आता सुमारे 160 कोटी रुपयांच्या असनोडा बायपासच्या बांधकामासाठी निविदा काढल्या आहेत. असनोडा बायपाससाठी पूर्ण निधी राज्य सरकार देणार आहे.
हा राज्य महामार्ग-1 असून या प्रकल्पासाठी यापूर्वीच निविदा काढली आहे. 10 जुलै रोजी तांत्रिक निविदा उघडल्या जातील. सर्व काही सुरळीत पार पडले तर पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरवात होऊ शकते. हे काम 18 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे काम होणार आहे.
प्रकल्पासाठीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. बायपासमध्ये एक मोठा उड्डाणपूल आणि काही लहान पुलांचाही समावेश असेल. डिचोली बायपासचे काम गोव्यातील अस्मास कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून सुरू आहे. त्यासाठीही राज्याने निधी दिला आहे.
हा बायपास बोर्डे ते डिचोलीतील सर्वणपर्यंत 4.6 किमीचा विस्तार करेल. हा राज्य महामार्ग देखील चौपदरी होणार असून पुढील वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सध्या डिचोली शहरातून जात असलेली आंतरराज्यीय मार्गावरून जाणारी सर्व अवजड वाहने भविष्यात बायपासवरून वळवली जातील. त्यामुळे सध्याच्या वाहतूक कोंडीतून डिचोलीवासींयांची सुटका होऊ शकते.
या दोन्ही बायपासचे नियोजन 2013-14 पासून करण्यात आले आहे.