INDIA मधील १६ पक्षांच्या २० नेत्यांचं शिष्टमंडळ उद्या मणिपूरला…
भारताचं ईशान्येकडील राज्य मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून धगधगतंय. तीन महिन्यांपासून तिथे हिंसाचार सुरू आहे. तिथल्या गुन्हेगारी आणि संतापजनक घटनांचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत आहेत. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
अशातच विरोधी पक्षांनी लोकसभेत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्ष लोकसभेत तसेच राज्यसभेत मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी करत आहेत. तसेच या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत बोलावं अशी मागणी करत आहेत. परंतु, पंतप्रधान अद्याप संसदेत याविषयी काही बोललेले नाहीत. अशातच आता विरोधी पक्ष मणिपूरचा दौरा करणार आहेत.
केंद्रातल्या भाजपाप्रणित एनडीएच्या सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. विरोधी पक्षांनी त्यांची आघाडी तयार करून त्याला I.N.D.I.A (इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स) असं नाव दिलं आहे. विरोधकांच्या या आघाडीचं एक शिष्टमंडळ दोन दिवसांसाठी मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. या शिष्टमंडळात १६ पक्षांच्या एकूण २० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे शिष्टमंडळ तिथल्या सत्य परिस्थितीचा आढावा घेईल.
काँग्रेसचे खासदार सय्यद नासीर हुसैन यांनी सांगितलं की, शनिवारी ‘इंडिया’चं एक शिष्टमंडळ मणिपूरमधील डोंगराळ प्रदेश आणि खोऱ्यातील ज्या-ज्या भागांमध्ये हिंसाचार झाला आहे तिथल्या मदत शिबिरांना भेट देईल. आम्ही मणिपूरवासियांच्या पाठीशी आहोत हा संदेश घेऊन तिकडे जात आहोत. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही आमच्या परिने सर्वकाही करू. हे शिष्टमंडळ मणिपूरच्या राज्यपालांचीही भेट घेणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच मणिपूरचा दौरा केला आहे. राहुल गांधींशिवाय डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही मणपूरमधील हिंसाचार झालेल्या भागांना भेट दिली आहे, तसेच पीडितांची भेट घेतली आहे.