पणजी:
राज्य यावर्षी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. अनौपचारिक रित्या उद्घाटन झालेल्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पणजी येथे होणार आहे. गोमंतकीयांसाठी भूषणावह असलेल्या या यजमानपदासोबत अजून एक विशेष बाब प्राप्त झाली आहे, ती म्हणजे या औपचारिक उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन गोमंतकीय युवा कलाकार आणि प्रसिद्ध सूत्रसंचालक रोहित खांडेकर करणार आहे.
दिकॉस्टा हाऊस या कोंकणी सिनेमाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त पसंती लाभलेला रोहित खांडेकर कलाक्षेत्रासोबतच आपल्या प्रभावी व ओघावत्या सूत्रसंचालनासाठी प्रसिध्द आहे. यापूर्वीही रोहितने विविध कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशभरातील खेळाडूंच्या साक्षीने होत असलेल्या या विशेष औपचारिक कार्यक्रमाची धुरा रोहित खांडेकर सांभाळत असल्याबद्दल राज्यभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.