शिवेद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार ‘यांना’ देणार प्राधान्य…
सातारा (महेश पवार)
कोयना बॅक वॉटर, शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे. एमटीडीसीद्वारे सुरु होत असलेला देशातील असा एकमेव प्रकल्प असून यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या जलपर्यटन केंद्रावर स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे अशी सूचना या भागाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुनावळे ता. जावली येथे शिवेंद्रसिंहराजेंच्या अथक पाठपुराव्यानंतर शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. या वॉटर स्पोर्ट, जलपर्यटन केंद्राचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे, आ. मकरंद पाटील, नाना पाटेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले, मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र सुरु झाल्याने या भागात पर्यटनवाढीला मोठी चालन मिळणार आहे. येथील विविध प्रकारचे प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मांडले असून ते सोडवण्यासाठी निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या भागात सुरु असलेल्या रस्ते आणि मोठ्या पुलांच्या कामामुळे येथून थेट कोकणात जाता येणार असून पर्यटकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जलपर्यटन केंद्रामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरु करण्यात आला असला तरी, याठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. स्थानिक लोक रोजीरोटीसाठी मुंबईला जात असतात. हे चित्र बदलावे यासाठीच या भागात पर्यटनवाढीला चालना देणे, विविध प्रकल्प आणणे यासाठी प्राधान्य देत आहे. मुख्यमंत्री हे या भागाचे सुपुत्र आहेत, त्यांनी स्थानिकांना प्राधान्य देऊन या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सहकार्य करावे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.