गोमंतकीय भाजपची पॉवर बंद करतील : युरी आलेमाव
मडगाव :
ऐतिहासिक लोहिया मैदानावरील शॉर्ट सर्किटने ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे जपण्याबाबत भाजप सरकारची उदासीनता उघड झाली आहे. या ऐतिहासीक स्थळावर निवडणूक सभा घेण्यास परवानगी नाकारणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. 7 मे रोजी भाजपचा फ्यूज काढून टाकू आणि भाजपची पॉवर बंद करू, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
लोहिया मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्याबद्दल प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, भाजपचा विकास हाच एक शॉर्ट सर्किट आहे.
लोहिया मैदानाच्या तथाकथित नूतनीकरणावर सरकारने जवळपास 5?कोटी खर्च केले. जानेवारी 2022 मध्ये हे काम पूर्ण व्हायचे होते, परंतु आजपर्यंत लोहिया मैदानाचे काम अपूर्णच आहे. भाजप सरकारने केवळ वरवरची मलमपट्टी केली आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
लोहिया मैदानावरील स्टेजच्या मध्यभागी एक दरवाजा बनवला होता जो नंतर नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर बंद करण्यात आला. व्यासपिठामागे असलेला तथाकथित ग्रीन रुम म्हणजे एक कचराकुंडी बनली आहे. स्टेजचा आकार आता कमी करण्यात आला आहे आणि त्यामुळे सभा घेणेही गैरसोयीचे झाले आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
गोव्याच्या अस्मितेची आठवण करून देणाऱ्या या सर्व ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांकडे सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. मी विधानसभेत मुद्दा उपस्थित करून आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लेखी पत्रे पाठवूनही लोहिया मैदानाला ऐतिहासिक महत्त्वाची जागा म्हणून अधिसूचित करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. यातून भाजपचा खरा चेहरा समोर येतो, असे युरी आलेमाव म्हणाले.
मला हे जाणून घ्यायचे आहे की नवीन नूतनीकरण केलेल्या प्रकल्पात शॉर्ट सर्किट कसे होऊ शकते? त्याला जबाबदार कोण? कोटय़वधी खर्च झाले तरी कामात गलथानपणा का? हे सरकारने मडगावच्या नागरिकांना समजावून सांगावे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.