‘हा’ तर आम्हा कुंकळ्ळीकरांचा अपमान – आसिज नोरोन्हा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी “चीफटेन्स उठाव स्मरण दिन” कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर स्वताचा फोटो टाकला, परंतु 15 जुलै 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचे गोडवे गाणारे मंत्री सुभाष फळदेसाई कार्यक्रमात भाषण करतील पण विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांना बोलण्याची संधी न देणे हा कुंकळ्ळीकरांचा अपमान आहे, असा सणसणीत टोला कुंकळ्ळी गट काँग्रेसचे अध्यक्ष आसिस नोरोन्हा यांनी हाणाला आहे.
सोमवारी 15 जुलै 2024 रोजी कुंकळ्ळी येथे पाळल्या जाणाऱ्या “सरदारांच्या उठावाच्या स्मरण दिना” च्या सरकारने जारी केलेल्या निमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, आसिज नोरोन्हा यांनी अशा कार्यक्रमांमध्ये राजकारण केल्याबद्दल भाजप सरकारवर सडकून टीका केली.
विविध मतदारसंघात आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमात स्थानिक आमदारांची भाषणे समाविष्ट करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. योगायोगाने आमचे आमदार विरोधी पक्षनेतेही आहेत. भाजप सरकार कटू सत्य ऐकण्यास घाबरत आहे आणि म्हणूनच युरी आलेमाव यांचे भाषण या कार्यक्रमात समाविष्ट केले नाही, असे आसिस नोरोन्हा म्हणाले.
निमंत्रण पत्रिकेच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपला फोटो घालतात, पण त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यावरून भाजपची बेगडी देशभक्ती आणि राष्ट्रवाद दिसून येते, असे आसिस नोरोन्हा यांनी म्हटले आहे.
भाजपला ऐतिहासिक महत्त्वाचे दिवस केवळ निवडणुकीच्या काळातच आठवतात. काँग्रेसचे माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या कारकिर्दीत सदर स्मारकाचे नूतनीकरण झाले होते. मागिल बारा वर्षात सरदारांच्या स्मारकाचे नूतनीकरण सोडाच, देखभाल करण्यातही भाजप सरकार अपयशी ठरले आहे. आमच्या आमदाराने वारंवार विनंती करूनही, सरकारने स्मारकाला “ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण” म्हणून अधिसूचित करण्यासाठी पावले उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे आसिस नोरोन्हा यांनी निदर्शनास आणून दिले.