आयनॉक्स प्रांगणात लागलेल्या आगीसाठी सरकार जबाबदार : अमरनाथ
पणजी :
आयनॉक्स कोर्टयार्ड आणि जुने गोमेको इस्पितळाची वारसा इमारत परिसरात आज लागलेल्या आगीला कारणीभूत वेल्डिंग कामाला परवानगी कशी देण्यात आली? अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर विभागाच्या सर्व परवानग्या आयोजकांनी घेतल्या आहेत का, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
आयनॉक्स कोर्टयार्डमधील एका मोठ्या मंडपाला आग लागण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी लोकांचे जीवन धोक्यात आणल्याबद्दल भाजप सरकारवर सडकुन टीका केली.
वारसा इमारत आणि चार स्क्रिनचे आयनॉक्स चित्रपटगृह यांच्या मधोमध असलेल्या जागेत आयनॉक्सचे सुरक्षा उपव्यवस्थापक सूरज शितोळे यांनी सांगितल्याप्रमाणे आगीला जबाबदार असलेल्या वेल्डिंगच्या कामाला परवानगी कशी मिळाली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. सदर वेल्डिंगचे काम करण्यासाठी वीज जोडणी कोणी दिली? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी केला.
आयनॉक्सला भेट देणाऱ्या लोकांसाठी येजा करण्याची वाट असलेल्या खुल्या जागेत मंडप उभारण्यासाठी सरकारने परवानगी कशी दिली? असा प्रश्न विचारुन, यावरुन नागरिकांच्या सुरक्षिततेकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष दिसून येते, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.
आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जे गृहमंत्री आणि गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष आहेत यांच्याकडे आगीच्या घटनेवर सविस्तर अहवालाची मागणी करतो. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जे कोण हलगर्जीपणा व आगीच्या घटनेस जबाबदार आहेत अशा सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.