गोवा

तुयेतील हॉस्पिटल करावे जीएमसीसोबत संलग्नित : आप 

पणजी  :
पेडणे  तालुक्यातील तुये या गावात ८० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीत गोवा मेडीकल कॉलेज , पणजी या इस्पीतळाशी सलंग्न शंभर खाटांचे इस्पीतळ सुरू करून पेडणेवासियांना लवकरात लवकर आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे (आप पार्टी) अध्यक्ष ॲड. अमित पालेकर व पेडणे तालुका आम आदमी पक्षाचे नेते पुंडलीक धारगळकर व मांद्रे विभागाच्या आम आदमी पार्टीच्या महिला प्रमुख सुवर्णा हरमलकर यांनी केले आहे.

तसेच २० जुलै  २०२५  रोजी सकाळी १०.३० वाजता तुये हाॅस्पीटल कृती समितीने आयोजित केलेल्या जाहीर सभेला आम आदमी पार्टीनै जाहीर पाठिंबा दर्शविला असून, आहे. सर्व सामान्य नागरिकांनी बोलावलेल्या या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आले आहे.

आम आदमी पक्षाचे गोवा राज्य अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी पुढे म्हणाले सांगितले की, २०१२ साली त्यावेळचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी या इस्पीतळाची पायाभरणी केली होती. त्यावेळी ४० ते ५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असल्याचे म्हटले होते. जवळ जवळ एक तप पूर्ण झाले तरी तुये इस्पीतळ प्रकल्प पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेवटी २८ रोजी पेडणे वासियांनी अर्धवट स्थितीत असलेल्या या इमारतीची पाहणी केली. अर्धवट स्थितीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली व हे इस्पीतळ लवकरात लवकर सुरू करण्यासाठी चळवळ सुरू केली. २८ रोजी असलेल्या व तुये नागरिक कृती समितीने बोलावलेल्या सभेला आम आदमी पार्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी सहभागी झाले होते.

गेले वर्षभर तुये नागरिक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सरकारचे या प्रकल्पाकडे लक्ष वेधून घेतले. नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच सर्व पंचायतींतून ठराव घेऊन पाठवण्यास सांगितले तरी, इस्पीतळाचे काम सुरू होण्याची चिन्हे दिसेनात. पेडणे व मांद्रेतील लोकांना आरोग्य सुविधांसाठी पणजी किंवा म्हापसा येथे धाव घ्यावी लागते. तातडीच्या वेळी ही सुविधा उपलब्ध नसल्याने, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तरी सरकारने लवकरात लवकर तुये इस्पीतळाचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केली.

पेडणे तालुका आम आदमी पार्टीचे नेते पुंडलीक धारगळकर यांनी सांगितले की, तुये सार्वजनिक आरोग्य केंद्र ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीतून नव्या इमारतीत सार्वजनिक आरोग्य केंद्र आणण्याचा घाट सरकार करीत आहे. ज्या गोष्टीसाठी ८० कोटी रुपये खर्च करून  इमारत उभारली त्या ठिकाणी सूसज्ज इस्पीतळ सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.

आम आदमी पार्टी महिला विभाग प्रमुख सुवर्णा हरमलकर यांनी सांगितले की, तुये सार्वजनिक केंद्रात सर्व साधन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिला रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. लहान, लहान आरोग्याच्या समस्यांसाठी पणजी किंवा म्हापसा येथील इस्पीतळात जावे लागते. सदर नवीन इमारत पूर्णपणे वापरण्यासाठी तयार नसली तरी वीज बिलांसाठी सरकारला दर महिना तीन लाख रुपयांचा खर्च येत असतो. याची दखल घेऊन सरकारने तुये इस्पीतळ लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!