राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर ‘आप’ने व्यक्त केली चिंता
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालले असताना भाजप सरकार मात्र विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यात दंग आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला. विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्याऐवजी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे सरकारला आवाहन केले.
शुक्रवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना आपचे नेते संदेश तेलेकर देसाई यांनी निदर्शनास आणून दिले की, आपचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना अटक करताना मोठ्या प्रमाणात पोलिस संसाधने देण्यात आली होती. मात्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी हाच भाजप सरकार याच पोलिस संसाधनांचा प्रभावीपणे वापर करत नाही.
आपच्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या “गेल्या साडे पाच वर्षांमध्ये 400 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे ज्यामध्ये खून, बलात्कार, विनयभंग यासारख्या त्रासदायक घटनांचा समावेश आहे. राज्यातील गृह खात्याला अजून सिद्धी नाईक प्रकरण सोडवता आले नाही. यावरून राज्यातील गृह खाते आणि गृह मंत्री किती अकार्यक्षम आहे हे लक्षात येते”.
आप नेते वाल्मिकी नाईक यांनी भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या गंभीर आव्हानांना सामोरे जाण्याऐवजी ‘आप’ला दडपण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप केला. बिघडलेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी नाईक यांनी राज्यपालांना गृहमंत्र्यांना बोलावण्याचे आवाहन केले.
नाईक यांनी यावेळी आप अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि भाजप सरकारच्या षडयंत्राच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई, काँग्रेसचे प्रमुख युरी आलेमाव आणि टीएमसी नेते सामिल वळवईकर यांचे आभार मानले.
“इव्हेंट मॅनेजमेंट सरकारला” प्रशासन चालविण्यास असमर्थ असल्याची टीका आप नेते ॲड. सुरेल तिळवे यांनी केली. भाजपच्या माजी उपमंत्र्यांचा फोन दोन वर्षांपूर्वी हॅक झाला होता. दोन वर्षांच्या कालावधीनंतरही गृह खाते गुन्हेगारांना पकडू शकले नाही. भाजपचेच मंत्री लैंगिक गैरवर्तन प्रकरणात अडकलेले असताना भाजप सरकार नागरिकांच्या सुरक्षेची हमी कशी देऊ शकते, असा सवालही तिळवे यांनी केला