
‘आषाढी’निमित्त फोंड्यात रंगणार ‘पांडुरंगा विठ्ठला’
फोंडा:
गोव्यातील प्रसिद्ध इव्हेंट संस्थांपैकी एक असलेल्या राजेश्री क्रिएशन्सच्या पुढाकाराने आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, गोवा सरकार यांच्या सहकार्याने ‘पांडुरंगा विठ्ठला’ हा खास भक्तीसंगीतमय कार्यक्रम येत्या शनिवार, ५ जुलै २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
विश्वनाथ (अपूर्व) दळवी यांचे विशेष सहकार्य लाभलेल्या या भक्तिरसांच्या कार्यक्रमात गोमंतकीय आणि महाराष्ट्रीयन कलाकार एकत्रित येऊन भक्ती, संगीत आणि संस्कृती यांचा संगम घडवून आणणार आहेत.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि ‘सा रे ग म प’ फेम मानसी केळकर आणि मराठी टीव्ही अभिनेता हेमंत बर्वे हे विशेष गायन सादर करणार आहेत. त्यांच्यासोबत गोव्यातील प्रसिद्ध गायक, संगीतकार अजय नाईक, समृद्ध चोडणकर, ऋतुजा लोटलीकर, निळकंठ गावडे, सूरज सुतार, दिव्या च्यारी आणि दिव्या गावडे यांचा प्रमुख समावेश असणार आहे.
या सर्व गायकांना विष्णू शिरोडकर व दिनेश वालवलकर (किबोर्ड), रोहित बांदोडकर (तबला), गौरव पिंगुळकर (पखवाज), प्रकाश पेडणेकर (ऑक्टोपॅड), योगेश रायकऱ (साइड रिदम) आणि रोहन नाईक (बेस गिटार) हे संगीतसाथ करणार आहेत.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रिओळचे लोकप्रिय आमदार गोविंद गावडे उपस्थित राहणार आहेत. तसेच कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेलिप हे सन्माननीय अतिथी म्हणून तर फोंडा नगरसेवक विश्वनाथ (अपूर्व) दळवी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राजेश्री क्रिएशन्सने गेल्या १५ वर्षांत ७० हून अधिक यशस्वी वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करत गोव्यात आणि गोव्याबाहेरही आपली विशेष नाममुद्रा उमटवली आहे. त्यामुळे या संस्थेकडून ‘पांडुरंगा विठ्ठला’ या भक्तिरसात न्हालेल्या कार्यक्रमातून गोव्यातील रसिकांना एक संस्मरणीय अनुभव मिळेल, असा विश्वास यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.