
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी युरी आलेमाव झाले आक्रमक
या अधिवेशनात काँग्रेसचे तिन्ही आमदार इतर विरोधी आमदारांसह सर्व “बाबडे” गोमंतकीयांच्या व्यथा मांडतील. आज गोमंतकीयांना नेतृत्वहीन आणि खतखतें बनलेल्या अत्यंत संवेदनशून्य भाजप सरकारने आर्थिक अडचणीत ढकलले आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आठव्या गोवा विधानसभेच्या सातव्या अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दाबोळी विमानतळावरून विमानसेवा स्थलांतरित करणे, वीज दरात वाढ यासारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर विरोधकांना तोंड देण्याचे धाडस नसल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज प्रश्नोत्तराचा तास खंडीत केला. आम्ही त्याच प्रश्नांवर सरकारकडून उत्तरे मिळविण्यासाठी लवकरात लवकर संधी घेऊ, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी कुंकळ्ळी येथील सरदारांच्या स्मारकाच्या प्रलंबित नूतनीकरणाच्या कामाचा मुद्दा उपस्थित करुन सरकारला जाब विचारला व सदर काम तातडीने हाती घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून घेतले.
सांडपाणी जोडणी समस्येवरील लक्षवेधी सुचनेच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांडपाणी वाहतूक करणाऱ्या पाण्याच्या टँकरचा मुद्दा उपस्थित केला. सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाण्याच्या टँकरवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याचे त्यांना आश्वासन दिले.
पर्पल फेस्ट 2023 शी संबंधित कामामध्ये मिरामार किनाऱ्यावर 49 लाख खर्च करून दिव्यांग व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या सुविधा तयार करण्यात आल्या होत्या. परंतू, मिरामारसह गोव्यातील कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर दिव्यांग व्यक्तींना प्रवेश सुलभत मिळत नाही, असे युरी आलेमाव यांनी दिव्यांग व्यक्तींच्या प्रवेश सुलभतेवर लक्षवेधी सुचनेवरील चर्चेत भाग घेताना नमूद केले.
याच मुद्द्यावर पुढे बोलताना युरी आलेमाव यांनी सांगितले की, सुलभ भारत मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 22 इमारती सुलभ करण्यासाठी सरकारने 13.71 कोटी खर्च केले. दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 45 इमारतींची नोंद करण्यात आली होती. परंतू, दिव्यांग व्यक्तींना अजूनही गोवा विधानसभा संकुलासह सरकारी इमारतींमध्ये प्रवेश करणे कठीण होत आहे.