
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
मुंबई : अभिनेते आदिनाथ म. कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी परस्पर संमतीने वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संयुक्त निवेदनाद्वारे दिली आहे. मात्र, मुलगी जिजाच्या संगोपनासाठी दोघेही एकत्रितपणे जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, दीर्घ विचारांती आणि परस्पर सामंजस्यानंतर पती-पत्नी म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे. “जोडीदार म्हणून आमचा प्रवास येथे संपत असला, तरी मुलगी जिजासाठी आम्ही कायम एकत्र आहोत. तिचे प्रेम, सुरक्षितता आणि आनंद यांना सर्वोच्च प्राधान्य देत आम्ही सहपालकत्व (को-पॅरेंटिंग) स्वीकारले आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
दोघांनीही एकमेकांविषयी आदर कायम राहील, असे सांगत गेल्या अनेक वर्षांत माध्यमे आणि चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तसेच, हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णय असून, या काळात त्यांच्या गोपनीयतेचा आदर राखावा, अशी विनंती त्यांनी माध्यमे आणि जनतेला केली आहे. या विषयावर यापुढे कोणतीही प्रतिक्रिया किंवा चर्चा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.






