google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

पक्षांतरानंतर मडगावचे आमदार दिगंबर कामत हे हुकूमशहा बनले : प्रभव नायक

मडगाव :

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या संमतीशिवाय कोणतेही अर्ज स्वीकारू नयेत, असा आदेश दिल्याने मडगावातील नागरिकांना त्यांची छोटी-मोठी कामे विविध शासकीय विभागांतून करून घेताना त्रास सहन करावा लागत आहे. पक्षांतरानंतर मडगावचे आमदार दिगंबर कामत हे हुकूमशहा झाले आहेत, असा आरोप युवा नेते प्रभव नायक यांनी केला.


मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आठ आमदारांच्या पक्षांतराला दोन वर्षे झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना युवा नेते प्रभव नायक यांनी भारतीय लोकशाही आणि संविधानाचा खून करून त्यांना निवडून दिलेल्या मडगावकराना मान खाली घालायला लावल्याबद्दल मडगावच्या आमदारांवर टीका केली. त्यांचे पक्षांतर हे केवळ स्वत:च्या भल्यासाठी होते, असे प्रभव नायक म्हणाले.


मडगावचे आमदार दिगंबर कामत त्यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न करणाऱ्या पत्रकारांच्या व  मीडियाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत असतानाचा व्हिडीयो प्रभव नायक यांनी दाखवला. मडगावच्या आमदाराने केवळ प्रसारमाध्यमे आणि मडगावच्या नागरिकांचा अपमान केला नाही तर सर्वशक्तिमान देवाचा अनादर केला आहे, असे प्रभव नायक म्हणाले.

मडगाव नगरपालिकेतील निधीच्या गैरव्यवहाराबाबत मडगावच्या आमदारांनी मौन बाळगले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, २००७ ते २०१२ पर्यंत दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकार लूटमार सरकार होते. यावरून मडगावचे आमदार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे दिसून येते, असे प्रभव नायक म्हणाले.

गोव्याबाहेरून आलेल्या माझ्या मित्रांना सांगायला मला लाज वाटते की माझ्या शहराचे प्रतिनिधित्व एकेकाळी गोव्याचे मुख्यमंत्री करत होते. ढासळणाऱ्या मडगाव शहराच्या स्थितीला मडगावचे आमदार दिगंबर कामत हे सर्वस्वी जबाबदार आहेत. ते मुख्यमंत्री असताना काहीही करू शकले नाहीत आणि आता फक्त “घराणेशाही” चा प्रचार करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे, असा आरोप प्रभव नायक यांनी केला.

त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय पूर्ण झाले नाही. हे रुग्णालय अद्याप पूर्णपणे कार्यरत नाही. लोक समस्यांना तोंड देत आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधीकारी संकुलाचे ते उद्घाटन करु शकले नाहीत. आज सदर प्रकल्प समस्यांचे आगर बनला आहे. सदर प्रकल्पात जाणाऱ्या नागरीकांना समस्यांना सामोरे जावे लागते. आनाफोंत उद्यानातील कारंजे पांढरे हत्ती बनले आहेत. बहुमजली पार्किंग प्रकल्प धूळ खात पडला आहे हे प्रभव नायक यांनी निदर्शनास आणून दिले.

मडगाव न्यू मार्केट आज धोक्याचे ठिकाण बनले आहे. आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यास आमदारांना यश आलेले नाही. पिकअप स्टेंडचा विषय तसाच प्रलंबित आहे. लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाने तेथिल समस्या वाढल्या आहेत. नवीन व्यासपीठाचा आकार  लहान झाल्याचे आमदारानीच मान्य केले आहे. तेथे रात्री अंधार पसरलेला असतो. मडगावच्या आमदारांच्या निष्क्रीयतेने कंदबा बस स्थानक अजुनही आकार घेवू शकलेले नाही असे प्रभव नायक म्हणाले.

मडगावची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. वाहतूक बेटांवर झुडपे वाडली आहेत. मडगावच्या आमदारानी स्वताला नगरसेवकाच्या पदावर आणले आहे, असा टोला प्रभव नायक यांनी हाणला.
मडगावकरांना आता आमदारांच्या एकंदर कारभाराचा अंदाज आला असून, लोकसभा निवडणूकांचा निकाल त्याचे द्योतक आहे. वयाची सत्तरी गाठलेल्या मडगावचे आमदार मागील ३० वर्षात जे करु शकले नाहीत ते पुढील ३ वर्षात करु शकणार नाहीते हे मडगावकरांनी जाणले आहे, असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!