google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या निधीची स्वप्ने पाहणे थांबवावे : युरी


मडगाव :

वर्तमानात जगा! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तिच्या ६० व्या वर्षासाठी ३०० कोटी देण्याचे स्वतःचे आश्वासन पूर्ण न केलेल्या भाजप सरकारच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर ८००० कोटीसाठी अवलंबून राहून भविष्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा,  गोव्याकडे असलेल्या स्वताच्या निधीचे विवेकपूर्ण व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा,असा जबरदस्त टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात विविध प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे ८००० कोटींची मागणी केल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या संसदेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून गोव्यासाठी ३०० कोटींची घोषणा करुन प्रत्यक्षात केंद्र सरकारने गोवा मुक्तिच्या ६० वर्षांसाठी केवळ १५० कोटी दिल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपलब्ध संसाधनांचा विवेकपूर्वक वापर करून राज्याची अर्थव्यवस्था  सुव्यवस्थित करण्यावर भर देण्याची गरज आहे. भाजप सरकारने आधीच गोव्याला कर्जाच्या विळख्यात ढकलले असल्याने कठोर काटकसरीचे उपाय हाच एक मार्ग आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

भाजप सरकारने म्हादई आधीच कर्नाटकला विकली आहे. “सेव्ह सॉयल” कार्यक्रमावर करोडो खर्च झाले. काँग्रेसचा २१ कलमी लोकसभेचा जाहीरनामा वाचून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत खडबडून जागे झाले असून,  त्यांनी धरणे बांधण्यासाठी आणि मातीची धूप रोखण्यासाठी आता केंद्राकडे निधी मागितला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात काय केले ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे? अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

दररोज एक जीव घेणाऱ्या रस्त्यांची पायाभूत सुविधा सुधारण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. मडगाव आणि पणजी येथील बस टर्मिनस तसेच इतर ठिकाणी बस स्टँड निर्माण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करणे आवश्यक आहे. त्यानंतरच सरकार राज्यात रेल्वे विस्ताराचा विचार करू शकते, असे युरी आलेमाव म्हणाले.

समाजकल्याण योजनांच्या गरजू लाभार्थ्यांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत. खेळाडू आणि कलाकारांना त्यांच्या बक्षिसांची व अर्थसहाय्याचे लाभ वेळेत दिले जात नाहीत. खलाशांचे निवृत्तीवेतन विलंबित आहे, विधवा आणि ज्येष्ठ नागरिक वेळेवर आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी संघर्ष करतात, परंतु भाजप सरकार कार्यक्रमांवर अनेक कोटी खर्च करते, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

भाजप सरकारने आपल्या चुकीच्या धोरणांमुळे आणि प्राधान्यक्रमांमुळे गोव्याला आधीच आर्थिक आणीबाणीत ढकलले आहे. सरकारने इव्हेंट आयोजनावर होणारा फालतू खर्च त्वरित थांबवावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!