राजकीय फायद्यासाठी माझे शब्द फिरवू आणि वळवू नका… : कॅप्टन विरियातो
मडगाव :
प्रिय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राजकीय फायदा मिळवण्यासाठी आणि विष पसरवण्यासाठी माझ्या भाषणातील निवडक शब्द फिरवण्याचा प्रयत्न करू नका. मी जे बोललो त्यावर खुल्या चर्चेसाठी मी तयार आहे. परंतू त्याचवेळी गोव्याची ओळख नष्ट करणे, बेरोजगारी वाढणे, महागाई, गुन्हे आणि भाजप सरकारमधील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरही खुली चर्चेसाठी तुमची तयारी दाखवा , असे उघड आव्हान काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिले.
“भारतीय राज्यघटना गोमंतकीयांवर जबरदस्तीने लादण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराने केलेल्या वक्तव्यामूळे मी हैराण झालो आहे” असा पोस्ट आपल्या समाजमाध्यमांवर टाकल्याबद्दल कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा समाचार घेतला. माझे वक्तव्याचा सोयिस्कर अर्थ लावून राजकीय पोळी भाजू नका असा सल्ला कॅप्टन विरियातो यांनी भाजपला दिला आहे.
मी काय बोललो, कुठे बोललो, कोणत्या संदर्भात बोललो, सर्व काही जनतेसमोर आहे. जेव्हा भाजपवाले मूळ मुद्द्यांवर कात्रीत सापडतात तेव्हा ते लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. मी खूल्या चर्चेला सामोरे जाण्यासाठी आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.
मी भाजप राजवटीत झालेली संविधानाची हत्या, भ्रष्टाचार, महागाई, सामूहिक पक्षांतर, बेरोजगारी, गुन्हेगारी, महिला आणि बालकांवरील अत्याचार, गेल्या 10 वर्षात भाजपच्या राजवटीत झालेला पर्यावरणाचा ऱ्हास आणि गोव्यातील इतर सर्व मुद्द्यांवर खुल्या चर्चेसाठी तयार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 7 मे 2024 पूर्वी तारीख, वेळ आणि स्थळ निश्चित करावे, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.
मी सैन्यदलात काम केले आहे. मी कारगिल युद्धात भाग घेतला आहे. मला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून संविधानाचा आदर करणे आणि लोकशाहीचे रक्षण करणे याविषयीचे धडे घेण्याची गरज नाही. आम्ही आता भाजपच्या लक्ष विचलीत करण्याच्या डावपेचांना बळी पडणार नाही. प्रथम सर्व आघाड्यांवर भाजपच्या अपयशाची चर्चा करूया, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
आपलेच आमदार आणि मंत्री एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? दाबोळी येथील सोन्याच्या तस्करीविरोधात कॅबिनेट मंत्र्यांचा सहभाग असल्याच्या आमच्या तक्रारीवर ते शांत का? कला अकादमीच्या भ्रष्टाचारावर त्यांचे तोंड बंद का? असे सरळ प्रश्न कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
भाजपला ही सुंदर जमीन भांडवलदारांच्या ताब्यात द्यायची आहे हे दक्षिण गोव्याला कळून चुकले आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने गोवा मुक्त झाला आणि आम्ही आमचा गोवा भाजपला आमच्याकडून हिसकावून घेऊ देणार नाही, असा इशारा कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिला.