वर्षाला एक लाख, नोकरीत 50 टक्के आरक्षण, अंगणवाडी, मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट; काँग्रेसचे महिलांना वचन
मडगाव :
नारी न्याय हा संपूर्ण भारतातील महिलांसाठी न्याय आणि समानता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एक सशक्तीकरण उपक्रम आहे. नारी न्यायात महिला सशक्तीकरणाच्या अनेक प्रभावी उपायांचा समावेश आहे. नारी न्यायचा काँग्रेस जाहीरनामा महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी सामर्थ्य देईल, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
महिलांसाठी काँग्रेसच्या पाच वचनबद्धतेवर प्रकाश टाकत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोव्यातील महिलांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
प्रत्येक कुटुंबातील महिलांची महत्त्वाची भूमिका ओळखून, नारी न्याय अंतर्गत महालक्ष्मी योजना सुरू करणार असून, प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वर्षाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांची आर्थिक उन्नती तर होणार आहेच, शिवाय घरातील आणि समाजातील त्यांच्या योगदानाची दखलही घेतली जाणार आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
नोकऱ्यांच्या संधींमधील लैंगिक असमानतेवर उपाय म्हणून कॉंग्रेस पक्ष नारी न्याय अंतर्गत केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देणार आहे. पारंपारिक अडथळ्यांना तोडून, हा उपक्रम महिलांचा कार्यशक्तीमध्ये समान सहभाग सुनिश्चित करणार आहे तसेच सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणार आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
तळागाळातील महिला कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करण्यासाठी, कॉंग्रेस पक्षाने नारी न्याय अंतर्गत आशा, अंगणवाडी आणि मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांसाठी पगार दुप्पट करण्याचे वचन दिले आहे. यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा वाढेल शिवाय समुदाय कल्याणासाठी त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यात येईल, असे युरी आलेमाव म्हणाले.
तळागाळातील महिलांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण करण्यासाठी, कॉंग्रेस पक्षाने नारी न्याय अंतर्गत प्रत्येक गावात अधिकार मैत्रीची स्थापना करण्याचे ठरवीले आहे. यात समर्पित सुविधाकर्ते महिलांना कायदेशीर सल्ला आणि सहाय्य मिळवून देतील तसेच महिलांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी सक्षम बनवतील, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
नोकरदार महिलांसाठी सुरक्षित आणि आश्वासक निवासाची गरज लक्षात घेऊन, कॉंग्रेस पक्ष नारी न्याय अंतर्गत वसतिगृहांची संख्या दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे. सावित्रीबाई फुले वसतिगृहांद्वारे महिलांना घरापासून दूर राहून रोजगाराच्या संधी शोधून त्यांच्या स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणाला चालना देणारे अनुकूल वातावरण तयार करतील, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
थोडक्यात, नारी न्याय हे लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी, महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या काँग्रेस पक्षाच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देते. नारी न्याय हा उपक्रम अधिक समावेशक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करेल जिथे प्रत्येक स्त्रीला तिच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल, असे युरी आलेमाव म्हणाले.