
विद्यार्थी आंदोलनाला काँग्रेसची धार
पणजी : परीक्षा घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत गोवा काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून, आज आणि उद्या राज्यातील विविध जिल्हा व ब्लॉक स्तरावर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.
परीक्षा घोटाळ्याविरोधात आवाज उठविणाऱ्या विद्यार्थी आणि युवक कार्यकर्त्यांवर पोलिसांमार्फत कारवाई होत असल्याचा आरोप करत चोडणकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न काँग्रेसचा निर्धार अधिक बळकट करत आहे. परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी सांगितले.
भाजप सरकार जनसंपर्क मोहिमा, सामाजिक माध्यमांवरील प्रचार आणि आश्वासनांच्या माध्यमातून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत असले, तरी त्यामुळे परीक्षा घोटाळ्यांचा प्रश्न झाकला जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांना जाहिराती नव्हे, तर उत्तर आणि न्याय हवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसचे आंदोलन आता राज्यातील प्रत्येक जिल्हा, मतदारसंघ आणि ब्लॉक स्तरापर्यंत नेण्यात येईल. हे केवळ प्रतीकात्मक आंदोलन नसून न्यायासाठी सुरू केलेला सातत्यपूर्ण लढा आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि जबाबदारी निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा घोटाळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या प्रकरणावर संसदेत सविस्तर चर्चा घ्यावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे आणि कायदेशीर कारवाई तातडीने मागे घ्यावी, या मागण्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य राजकीय हितसंबंधांसाठी धोक्यात घालता कामा नये. पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि जबाबदार शासन ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असून, त्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असे चोडणकर यांनी सांगितले.







