google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
लेख

झगमगाट पलिकडील दिवाळी…

– केतकी जोशी

अंधार दूर सारून प्रकाश पसरवणारा सण म्हणजे दिवाळी, छोट्याशा पणतीनेही आसमंत उजळून जाऊ शकतो हे सांगणारा दिवस म्हणजे दिवाळी…खरंतर सगळ्यांकडेचच लगबग सुरु असेल. खरेदी, फराळ झाला असेल. जेवणाचे, भेटीगाठींचे बेत ठरले असतील किंवा ठरत असतील. पाडवा, भाऊबीजेला काय द्यायचं, घ्यायचं हेही ठरवलं असेल. नवे कपडे, दागिने,फटाके, फराळ या सगळ्यामध्ये आपण चार दिवस हरवून जातो, सगळी दु:ख विसरण्याचाच प्रयत्न तरी करतो..रिलॅक्स होतो..मस्त जेवण, फराळ, घरी गप्पाटप्पा, भेटीगाठी, सगळं कसं हवंहवंसं…पण या सगळ्यांमध्ये आपल्या घरच्या बायकांना पण तितकंच मस्त आणि रिलॅक्स वाटतंय का याचा किती विचार केला जातो?

सण समारंभ सगळ्यांसाठीच असतात. पण अगदी पूर्वीपासून बघितलं तर सण म्हणजे जणू महिलांची मक्तेदारी असं गृहीत धरलं गेलं आहे. बरं ही मक्तेदारी कशामध्ये? तर कामं करण्यात, राबण्यात, अखंड गॅसजवळ उभं राहून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनविण्यात,साफसफाई करण्यात. घरातल्या बायकांना आपल्या घरच्यांसाठी हे करण्यात अजिबात त्रास होत नाही हे जरी खरं असलं तरी ते कितपत ताणावं हेही आपल्याच हातात आहे. अगदी पूर्वीपासूनच गौरीगणपतीसारखी सण म्हटला की सगळी आवरसावर, त्यानंतर काही फराळाचे, नैवेद्याचे पदार्थ, स्वयंपाक हे सगळं घरातल्या बायकाच करणार हे गृहीत धरलेलं. पण यात घरातल्या मुलांनी, पुरुषांनी हातभार लावू नये असं कुणीच म्हटलेलं नाही. गौरी जेवणाच्या दिवशी मस्त जेवण करून निवांत पहुडणारे आपले वडील, काका बघून त्या घरातल्या पुढच्या पिढीची मुलंही हे असंच असतं असं समजतात. घरातल्या बायका जेवायला बसेपर्यंत उशीर झालेला असतो. त्यांना दोन पदार्थ गरम करून वाढणं, त्यांच्यासाठी म्हणून कुणीतरी जेवायला थांबणं या अगदी साध्यासोप्या गोष्टी आहेत. जेवण झाल्यानंतरची आवराआवरी केली तर मग सोने पें सुहागा…अर्थात हे होतंही असेल.नोकरी करणाऱ्या स्त्रिया, मुली सुट्टी घेऊन सणाचा आनंद घ्यायचा प्रयत्न करततात, आपल्या घरासाठी हे सगळं करायला त्यांना खरंच मनापासून आनंद होत असतो, पण हा आनंद द्विगुणित करणं हे घरातल्या पुरुषांच्या हातात असतं.

दिवाळीसारख्या सणांमध्ये साफसफाईत मदत केली की आपलं काम संपलं असं मानणारे बहुतेक जण असतात. पूर्वी आमच्या घरी पिंप भरून किंवा डबे भरून फराळ व्हायचा..आमची आई/काकू सगळं घरी करायच्या, हे असं म्हटलं की घरातली स्त्री कानकोंडी होऊन जाते. आपण कमी नको पडायला म्हणून कित्येकदा होत नसतानाही, तब्येतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून ती घरात फराळाचं करायला घेते. त्याचं कौतुक करण्याबरोबरच त्यात थोडा हातभार लावला किंवा यावेळेस आपण बाहेरून आणू, तू काळजी नको करूस, असं म्हटलं तर महिलांचं ऐन दिवाळीत किंवा दिवाळी झाल्यावर तब्येती बिघडण्याचं प्रमाण कमी होईल. घरी येणारे पाहुणेरावळे तिलाही हवेच असतात, त्यांच्याबरोबर गप्पा माराव्यात असं तिलाही वाटत असतंच की…पण तिचा सगळा वेळ जर स्वयंपाक आणि नंतरची आवराआवर यातच गेला तर तिला सणाचा आनंद कसा मिळेल? अगदी नवरात्र म्हणजे आदिशक्तीतचा, स्त्री शक्तीचा उत्सव म्हणतानाही तिचे उपास-तापास, व्रतवैकल्यांमध्ये फक्त तिला थोडा आराम दिला तर हा उत्सव खऱ्या अर्थाने तिचा उत्सव होईल.

या सणसमारंभात घरातल्या बायकांसाठी आणखी एक चिंतेची गोष्ट असते ती म्हणजे पाळी. ऐन सणातच पाळी आली तर ? या भीतीनं आधीच बायका घाबरलेल्या असतात. त्यात गौरी गणपती, नवरात्र, लक्ष्मीपूजन असेल तर मग बघायलाच नको. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या सर्रास घेतल्या जातात, कोणताही विचार न करता, तेही वैद्यकीय सल्ला न घेता. थेट मेडिकल स्टोअरमधून गोळ्या आणल्या जातात. अर्थातच याचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतोच. अनेकदा ऐन सणांमध्ये घरातल्या बायकांची चिडचिड होते. कारण हा सगळा ताण न झेपणारा असतो. पण घरातल्या पुरुषांचं याबाबतीतलं सहकार्य, पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. पाळी आली तरी आम्ही आहोत, तू गोळी घेऊ नकोस, असं म्हणत ठामपणे तिच्याबरोबर उभं राहण्याची गरज आहे. कित्येकदा आधीच्या पिढीतल्या बायकांना हे मनातून कुठेतरी सलत असतं, त्यांना थोडं समजावून, परिणांमांचं गांभीर्य लक्षात आणून दिलं तर खूप गोष्टी सुसह्य होतील. हे सण अगदी निर्मळ आनंदाने साजरे होतील.

या सगळ्यांमध्ये पुरुषांना विरोध आणि बाईनंच का काम करायचं असा हेतू अजिबात नाही. पण घर, संसार, त्यातली माणसं, जबाबदारी, कर्तव्य हे दोघांचंही असतं. त्यामुळे घरातले सण साजरे करणं हीसुध्दा दोघांचीच जबाबदारी असते. पूर्वी पुरुष कमावून आणायचे आणि बायकांनी घरातली कामं करायची अशी विभागणी होती. नोकरीसाठी, कमावण्यासाठी बायका बाहेर पडल्या. पण त्यांच्या घरातल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या नाहीत. उलट एरवी घराबाहेर असतं मग सणांचे चार दिवस करायलाच हवं, अशीच भावना असते. अनेक बायकांनाही अपराधी वाटत राहतं. अगदी ऑफिसमध्ये उच्च पदावर असलेल्या महिलांनाही आपण घरात फराळ वगैरे नाही केला तर कानकोंडं व्हायला होतं. सुट्टीसाठीची धडपड, नोकरी टिकवण्यासाठीची धडपड, घर आणि ऑफिस यांच्यात समन्वय साधून घरातल्यांना वेळ देण्याची धडपड, शॉपिंगसाठी, घर सजवण्यासाठीची धडपड, पाहुण्यांना काही कमी पडू नये म्हणून धडपड…काळ कितीही बदलला तरी सणांमध्ये घरातल्या स्त्रीची धडपड हे समीकरण बदलत नाही.


सणासुदीच्या काळात घरातल्या बायकांचं वेळेवर जेवण ही तर सगळ्यांत दुर्लक्ष होणारी गोष्ट आहे. उपासतापास किंवा मग स्वयंपाक, घरातल्या इतरांची जेवणं हे सगळं झालं की आपण जेवायला बसेपर्यंत कमालीचा उशीर झालेला असतो. प्रचंड थकल्याने, वेळ उलटून गेल्याने भूकही मेलेली असते. मग जेवण जात नाही. सणांमध्ये अनेक स्त्रियांना एसिडीटीचा त्रास होण्यामागे हेच कारण आहे. वयानुसार काहीजणींना औषधं सुरु असतात. पण औषधांसाठी खावं लागेल म्हणून औषधही टाळली जातात. घरातल्यांनी लक्ष देऊन निदान नाश्ता तरी वेळेवर होईल याची काही सोय केली तर पुढचं सगळं करणं ही डोकेदुखी होणार नाही. पटापटा आवरा असं ओरडून म्हणण्यापेक्षा मी हे करतो, तोपर्यंत तू हे कर…असं म्हटलं तर? सणाला फक्त महागडे कपडे, दागिने आणून देणं, नवीन वस्तू, घरातलं सामान आणलं की जबाबदारी संपते असं नाही. हे तर स्त्रियाही स्वत: विकत आणू शकतात. कितीतरीजणी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात, पण त्यांना मानसिक स्वातंत्र्य देणं हे महत्त्वाचं आहे.


या परिस्थितीत बदल नक्की होत आहे. सगळेच पुरुष वाईट आहेत असं नाही. अनेक घरांमध्ये बायकोच्या बरोबरीनं स्वयंपाकापासून प्रत्येक गोष्टीत सारखाच सहभाग घेणारे जोडीदार आहेत, आईला बरं नसेल तर सणांचा स्वयंपाक करणारी मुलं आहेत, आपण सगळे मिळून सगळं करू असं म्हणणारे सासरे आहेत. त्यांना घरातल्या बायकांचीही साथ हवी आहे. कितीतरी वेळेस मुलगा बायकोला मदत करतोय म्हटल्यावर टोमणे मारण्याचा मोह सासवांनी आवरायला हवा, आमच्याकाळी आम्ही हे सगळं, एकटे करायचो असं सतत ऐकवलं नाही तर तुमचंही ओझं कमी होऊ शकेल. घरातले बाबा, आजोबा यांना आपल्या आई-आजीला मदत करताना पाहून असं करणं हे वेगळं काही नाही तर आपलंही नेहमीचं काम आहे हे घरातल्या मुलांमध्ये आपोआप रुजतं.


सण-समारंभ म्हणजे सगळ्यांनी एकत्र येण्याचे क्षण असतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या जीवलगांबरोबर विरंगुळ्याचे चार क्षण यानिमित्ताने घालवता येतात. सगळी दु:ख विसरून पुन्हा एकदा रोजच्या आयुष्यातील सामोरं जाण्यासाठी हे सण आपल्याला उर्जा देतात. मग हे सण घरातल्या स्त्रियांसाठीही उर्जा देणारे असावेत, तिची उर्जा काढून घेणारे नव्हेत. सगळ्यांनी मिळून सणांच्या कामांची जबाबदारी वाटून घेतली तर प्रत्येक सण हा ‘ति’च्यासाठीही तितकाच आनंददायी होईल..कदाचित तुमच्या घरातली ‘ती’ तुम्हाला स्व:तहून हे सांगणार नाही..थोडा पुढाकार घेऊन बघा…या दिवाळीपासून सुरुवात करा..तुमच्या घरातल्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या लक्ष लक्ष दिव्यांचा आनंद दिसू लागेल आणि ती मनापासून म्हणेल..


इस प्यारी सी दुनिया में एक छोटा सा मेरा परिवार है,
खुशियाँ मुझे इतनी मिलती है जैसे रोज कोई त्यौहार है.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!