भंडारी समाज आमसभेत प्रचंड गोंधळ…
भंडारी समाजातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. या वादाचे पडसाद आज पाजीफोंड-मडगाव येथे झालेल्या आमसभेत उमटले. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यावर उपस्थित युवकांनी प्रश्नांचा भडिमार केला.
त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. अखेर नाईक यांच्यासह इतर सदस्यांनी ही बैठक अर्ध्यावर सोडली. त्यामुळे आमसभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
शुक्रवारी समाजाचे नेते उपेंद्र गावकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन विद्यमान समितीवर विविध आरोप केले होते. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनीही सोशल मीडियाद्वारे गावकर यांच्या आरोपांना उत्तर देत, त्यांच्यावर टीकाही केली होती.
उपेंद्र गावकर यांनी ‘भंडारी समाजाची समिती बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्ञाती बांधवांनी या आमसभेस उपस्थित राहू नये’, असे आवाहन पत्रकार परिषदेत केले होते. असे असतानाही रविवारच्या आमसभेत जवळपास 200 लोकांनी उपस्थिती लावली होती. ही उपस्थिती कमी असल्याने इतर सदस्यांमध्ये नाराजीही निर्माण झाली.
आमसभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातील महत्त्वाचा प्रश्न होता तो अध्यक्ष निवडीचा. ऑनलाईन पद्धतीने अध्यक्षांना कशी काय मुदतवाढ देण्यात आली, घटनेमध्ये असा कोणताही उल्लेख नसताना असा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न अशोक नाईक यांना विचारण्यात आला.
यावर नाईक यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये हमरीतुमरीची भाषाही करण्यात आली. वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नाईक यांनी अर्ध्यावर बैठक सोडली.