‘… म्हणून काँग्रेस पक्षांतर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत नाही’
पणजी:
निवडणूकापूर्वी भाजपशी करार केल्यामुळेच काँग्रेस पक्ष, पक्षांतर करणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करत नसल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी बुधवारी केला.
कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात उडी मारल्यावरही देशातील मोठा पक्ष काँग्रेस अजूनही हातावर हात धरून आहे. यामुळे आता सर्वांना ज्ञात झाले आहे की, कॉंग्रेस आणि भाजपाने मिळूनच हा षडयंत्र रचला असून यामागे कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत हे प्रमुख असल्याचा दावा नाईक यांनी केला. याशिवाय पी. चिदंबरम, दिनेश गुंडू राव आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर देखील या षडयंत्रात सामील असल्याचे सांगितले.
नाईक म्हणाले की, “पक्षांतर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे. अन्यथा लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल.”
यावेळी काँग्रेसने शपथपत्र प्रसिध्द करावे, असे आवाहन ‘आप’ने केले. नाईक म्हणाले, “निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वाक्षरी केलेले शपथपत्र कोणीही पाहिलेले नाही. दुसरीकडे, ‘आप’ने शपथपत्र घरोघरी पोहोचवले आणि सामाजिक माध्यमावरही प्रसिध्द करण्यात आले. याशिवाय, निवडून आलेल्या उमेदवाराने पक्ष बदलल्यास मतदारांना कायदेशीर कारवाई करण्याचीही ताकद आपच्या शपथपत्राने दिली.
काँग्रेस नेत्यांनी शपथपत्रात पक्षाचा उल्लेख केला होता की जनतेचा उल्लेख केला हे तपासणे महत्त्वाचे आहे. जर कॉंग्रेसने पक्षाचा उल्लेख केला असेल तर पक्षांतर करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करणे ही काँग्रेस नेत्यांची जबाबदारी आहे, असे नाईक म्हणाले.
पक्षांतर करणाऱ्यांविरोधात आंदोलन करून काँग्रेस पुन्हा मतदार आणि कार्यकर्त्यांना मूर्ख बनवत आहे, असे मडगावचे आप नेते लिंकन वाझ यांनी म्हटले. पक्षांतर करणाऱ्यांविरोधात आंदोलनात सहभाग न घेता काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची शपथपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मतदारांनी करावी, असे आवाहन वाझ यांनी केले.