Breast cancer रुग्णांसाठी आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
गोवा मेडिकल कॉलेज 4 फेब्रुवारीपासून स्तनांच्या कॅन्सरवरील ‘फेसगो’ हे इंजेक्शन मोफत देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीय. त्यांनी केलेल्या या महत्वाच्या घोषणेमुळे रुग्णांसाठी दिलासादायक चित्र तयार झाले आहे
पुढील दीड वर्षात अजून 1.50 लाख महिलांची तपासणी होणार असून गोव्याला स्तन कर्करोगमुक्त करणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. तसेच कॅन्सरग्रस्तांनाही डीडीएसएसवाय योजनेखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोव्यात 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अंदाजे 2.5 लाख महिला आहेत, पैकी आरोग्य सेवा संचालनालयाने स्तनाच्या कर्करोगासंबंधी 1 लाख महिलांचे स्कॅनिंग केले असून असे करण्यात गोवा पहिले राज्य असल्याची माहितीही विश्वजित राणे यांनी दिली.
पुढील दीड वर्षात उर्वरित काम पूर्ण करण्यात येऊन गोव्याला स्तन कर्करोगमुक्त करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
पुढील दोन महिन्यांत राज्यातील कॅन्सरग्रस्तांचीही डिजिटल नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना कॅन्सरग्रस्तांची माहिती आरोग्य खात्याला देणे बंधनकारक केले जाणार आहे.
याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. पुढील दोन वर्षांत राज्यातील टर्शरी कॅन्सर करार सेंटर पूर्ण होणार आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याला मदत केली असून त्यांचे या प्रकल्पाकडे विशेष लक्ष आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.